जिल्ह्यात येणाऱ्या प्रकल्पांबाबत पत्रकारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी.. पालकमंत्री ना. नितेश राणे
सिंधुदुर्ग। राजू तावडे
जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आणि इथल्या तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा गोव्याला जाण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्वांनी विकासाच्या प्रक्रियेत एकत्र येणे गरजेचे आहे. वैयक्तिक विरोधासाठी जिल्ह्याच्या विकासाला ब्रेक लावणे चुकीचे आहे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास खुंटत आहे. जिल्ह्यात येणाऱ्या चांगल्या प्रकल्पांबाबत पत्रकारांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले. सावंतवाडी तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार पुरस्कार वितरण सोहळा आणि पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांचा गौरव समारंभ आज गुरुवारी सावंतवाडी येथील शिल्पग्राम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धा सावंत – भोंसले, लखमराजे भोंसले, जिल्हा परिषद आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, जिल्हा परिषद सदस्य विक्रांत सावंत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन रेडकर आदी उपस्थित होते.
श्री. निलेश राणे म्हणाले, पत्रकारांना चुकीच्या गोष्टींचे कान टोचण्याचा अधिकार असून त्यांच्या टीकेतूनच आम्ही मार्गदर्शनाचा बोध घेतो. जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आणि इथल्या तरुणांना रोजगारासाठी मुंबई, पुणे किंवा गोव्याला जाण्यापासून रोखण्यासाठी आपण सर्वांनी विकासाच्या प्रक्रियेत एकत्र येणे गरजेचे आहे.
गेल्या काही वर्षांत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा झपाट्याने कायापालट होत आहे. लाल मातीच्या रस्त्यांपासून आपण काँक्रीटच्या रस्त्यांपर्यंत मजल मारली आहे. मात्र १० वी आणि १२ वीत यश मिळवणारा आपला विद्यार्थी रोजगारासाठी बाहेर का जातो ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ‘सी- वर्ल्ड’ सारखे प्रकल्प मार्गी लागले असते, तर आज जिल्ह्यातील १० टक्के तरुणांना गोव्याला जावे लागले नसते. असे श्री. राणे म्हणाले.
जिल्ह्यातील युवा पिढीच्या भविष्यासाठी अवैध धंद्याघ्या विरोधात आपण कणखर भूमिका घेतली. या भूमिकेला सावंतवाडी तालुक्यातील पत्रकारांनी दिलेला पाठिंबा कौतुकास्पद आहे. आम्ही विकासाच्या बाबतीत व पत्रकार संघाच्या कार्यासाठी नेहमीच तत्पर असून आपला सदैव पाठींबा राहील, अशी ग्वाही राणे यांनी यावेळी दिली.
या सोहळ्यात पालकमंत्री ना. नितेश राणे व मान्यवरांच्या हस्ते पत्रकार रुपेश हिराप यांना वैनतेयकार मे. द. शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार, सौ. मंगल नाईक-जोशी यांना माजी आमदार तथा ज्येष्ठ पत्रकार जयानंद मठकर आदर्श पत्रकार पुरस्कार, भगवान शेलटे यांना कै. हरिश्चंद्र वाडीकर आदर्श समाजसेवक पुरस्कार, जेष्ठ पत्रकार अभय पंडीत यांना कै. पांडुरंग स्वार स्मृती जीवनगौरव पुरस्कार तर संतोष परब यांना स्व. त्रि. अ. उर्फ बाप्पा धारणकर अष्टपैलू स्मृती पुरस्कार व कणकवली येथील छायाचित्रकार हेमंत काळसेकर यांना ज्येष्ठ पत्रकार तथा छायाचित्रकार कै. मुरलीधर तथा बंडोपंत भिसे स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.
तसेच विशेष प्राविण्यप्राप्त पत्रकार आणि पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरवात अवनिश अभिमन्यू लोंढे, आस्था लोंढे, सिद्धाई अजित दळवी, स्वरांगी शिवप्रसाद देसाई, मनस्वी प्रवीण मांजरेकर, दिया दिगंबर वायंगणकर,
श्रावणी विजय देसाई, अस्मी प्रवीण मांजरेकर, याचना महादेव सावंत, नैतिक नीलेश मोरजकर यांचा गुणगौरव करण्यात आला.
तर लायब्ररी सायन्स विषयात पीएचडी प्राप्त डॉ.भक्ती राजन तावडे – गांवस,
सेट परीक्षेत यश प्राप्त केलेल्या
मिहीर राजेश मोंडकर, रोट्रॅक्ट क्लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पत्रकार
सिद्धेश दिनेश सावंत, मळेवाड विभागातून पंचायत समिती सदस्यपदी निवडून आल्याबद्दल महिला पत्रकार धनश्री हेमंत मराठे तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल ज्येष्ठ छायाचित्रकार अनिल भिसे यांनाही पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष सचिन रेडकर यांच्या हस्ते पालकमंत्री नितेश राणे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सावंतवाडी सहकारी पतपेढीकडून ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे यांच्या संकल्पनेतून आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या तैलचित्राचे अनावरण पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिन रेडकर यांनी केले. सूत्रसंचालन मितल धुरी यांनी केले तर आभार विजय राऊत यांनी मानले.


