आंबोलीत सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेचा दोन दिवसीय स्नेह मेळावा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अग्रगण्य सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्मचारी आणि एजंट यांच्यासाठी ९ व १० मे रोजी आंबोली येथील सैनिक स्कूलमध्ये निवासी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते होणार आहे.
दैनंदिन कामाच्या व्यापातून कर्मचाऱ्यांना विरंगुळा मिळावा आणि विविध शाखांमधील कर्मचाऱ्यांचा एकमेकांशी संवाद वाढावा, या उद्देशाने या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. या प्रसंगी प्रा. अरुण पणदूरकर (वेळ व्यवस्थापन), डॉ. नायडू (आरोग्य), शरद सावंत (ग्राहक सेवा), भरत गावडे (योग) आणि के. बी. वरक (कर्ज वसुली) हे मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमात अभय आरांबेकर यांचा फनी गेम्सचा कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत गायन, मिमिक्री आणि दशावतार नाटक पार पडणार आहे. संस्थेचे सर्व संचालक आणि कर्मचारी या मेळाव्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती अध्यक्ष बाबुराव कविटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ यांनी दिली आहे.


