शेतकऱ्यांचा उद्धार करणे हे आपले धैय्य …. आमदार दीपक केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आज शेतकऱ्यांना मदतीची आवश्यकता असून त्यामुळे येणाऱ्या अस्मानी संकटांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी नियोजन करा. कोकणातील शेतकऱ्यांचा उद्धार करणे हे आपले धैय्य आहे. शेतकऱ्यांची सेना उभी करण्यासाठी काम करा. असे आवाहन माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केले. सावंतवाडी येथे खरीप हंगाम पूर्व सभेत ते बोलत होते.
सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आज शनिवारी कृषी विभागाकडून खरीप हंगाम पूर्व सभेच आयोजन केले होते. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यावेळी सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यातील विभागाचा आढावा घेण्यात आला. तसेच गतवर्षातील अहवाल सादर करण्यात आला. यावेळी श्री. केसरकर म्हणाले, चांदा ते बांदा योजनेतून शेतकऱ्यांच्या हितासाठी आपण योजना दिल्या आहेत. श्री पद्धतीने लागवड होऊन शेतकऱ्यांना उत्पन्न वाढीसाठी उद्दीष्ट्याच्या पुढे जाऊन प्रयत्न करावेत. ‘फूड सिक्युरिटी आर्मी’ योजनेतून शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मुलांसाठी लाभ देत आहोत. उन्हाळी शेतीच प्रमाण आपणाला वाढवणे आवश्यक आहे. दुबार पीकांचेही नियोजन होणे आवश्यक आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच यांत्रिकीकरणाची ही मदत घेणे आवश्यक आहे. आतापासून तयारी केली तर जून महिन्यात लागवड करणे सोप होईल. वाढत्या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्न करा असेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी कृषी अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. सभेत कृषी अधिकारी बोलत असताना अन्य कर्मचारी मोबाईलवर असतील, गप्पा गोष्टीत असतील तर सभा कोणासाठी होती ? असा सवाल त्यांनी केला. आमदार दीपक केसरकर यांनी दिलेल्या सुचनांचे पालन करा. शेतकऱ्यांना न्याय देऊन शेतीचा विकास व उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करा, शासनाने दिलेल उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा अशा सूचना त्यांनी केल्या.
यावेळी दोडामार्ग पं.स. उपसभापती गणेश प्रसाद गवस, जि.प. सदस्य सुधा कवठणकर, यज्ञा साळगावकर, विजय नाईक, तालुका कृषी अधिकारी सावंतवाडी जी.एस. गोरे, कृषी अधिकारी वेंगुर्ला मंगेश चव्हाण, कृषी अधिकारी दोडामार्ग एस. डी. कदम, पं.स. सदस्य महेश धुरी, जितेंद्र गांवकर, प्रणाली टिळवे, उत्कर्षा गांवकर, शरद धाऊसकर आदींसह कृषी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


