सावंतवाडी क्रीडा संकुलासाठी अतिरिक्त ७ कोटी मंजूर..आमदार दीपक केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडी शहरासाठी ५ कोटी खर्च करुन क्रीडा संकुल बनवले जात आहे. नवीन काही खेळाच्या सुविधा तिथे उपलब्ध होणार आहेत. अतिरिक्त ७ कोटी त्यासाठी मंजूर झालेत. सेमी ऑलिम्पिक मार्गासह विविध इनडोअर खेळ यात असणार आहेत अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज शनिवारी सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
श्री. केसरकर म्हणाले, सावंतवाडीत रमाकांत आचरेकर सरांच्या नावाने ड्रेसिंग रूम बांधण्यात आला आहे. क्रिकेटसह सर्व मैदानी खेळ खेळण्यासाठी इथे सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. स्विमिंगपूल सुरु करण्यासाठी नगराध्यक्ष सौ. श्रद्धा भोंसले व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर लक्ष घालत आहेत. खेळाच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. बांदा, दोडामार्ग येथे देखील क्रीडा संकुलासाठी प्रयत्नशील आहोत. बांद्याला अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.
सावंतवाडी नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून लवकरच तो उपलब्ध होईल. शहरात नळ पाणी योजने व गॅस पाईप लाईन या कामांमुळे नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होणार आहे. मात्र, काम करून घेणं आवश्यक आहे. संजू परब यांच्याशीही मी चर्चा करणार आहे. येत्या आठवड्यात नळ पाणी योजनेसह न.प.च्या कामाचा आढावा घेतला जाणार असून दोन्ही बाजुच्या नगरसेवकांना एकत्र बसवून मतभेद दूर केले जातील. असे श्री. केसरकर म्हणाले.
सावंतवाडीचा विकास झाला पाहिजे हा माझा उद्देश असून नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. चुकले असेल तिथे टिका झाली पाहिजे. मात्र, विकासकामात राजकारण येता नये असेही त्यांनी स्पष्ट केले. सत्ताधारी पक्षातील व्हायरल ऑडिओबाबत पत्रकारांनी विचारलं असता आपण तो ऑडिओ ऐकलेला नाही. त्यामुळे त्यावर बोलण उचित ठरणार नाही असे मत व्यक्त केले.
दगडी खाणीवर झालेली मारहाण चुकीची असून त्याची चौकशी करून यापुढे असे प्रकार होता नयेत याची दक्षता घेण्यासाठी सुचना देईन. तर दगडी खाणींमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.
कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कोणत्या पक्षात जावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, शिवसेना पक्षात ते आले तर आम्ही त्यांचे निश्चितच स्वागत करू असे मत व्यक्त केले. तर आमदार प्रमोद जठार काय बोलले हे त्यांचे मत आहे. जिल्ह्यात महायुती आहे व ती राहील असा विश्वास आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. यावेळी आरोग्य व क्रीडा सभापती सुधीर आडीवरेकर, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, पाणी पुरवठा सभापती प्रतीक बांदेकर आदी उपस्थित होते.


