अवकाळी पावसाने बागायतदार संकटात, विशेष मदत जाहीर करा : मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने बागायतदार संकटात आला आहे. शासनाने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी. बागायतदार शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर करावी, अशी मागणी सावंतवाडी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केली आहे.
सावंतवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. प्रशासनाने तत्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसेच शासनाने विशेष मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी श्री. मिलिंद सावंत यांनी केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे बागायतदार व शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आंबा व काजू हंगाम अंतिम टप्प्यात असताना अचानक झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळझड झाली आहे. अनेक ठिकाणी आंब्याची फळे झाडावरून खाली पडली असून काजू बियांचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी अहवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांनी जनावरांसाठी साठवून ठेवलेल्या गवताचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. आधीच वाढत्या खर्चामुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना या नैसर्गिक संकटाचा मोठा फटका बसला आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी प्रशासनाने नुकसानग्रस्त भागांची तात्काळ पाहणी करून पंचनामे करावेत, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदत मिळणे आवश्यक असून शासनाने विशेष पॅकेज जाहीर करून बागायतदारांना दिलासा द्यावा, असे त्यांनी सांगितले.


