वन्यजीव रक्षक श्री. संजय सावंत आणि भाग्यश्री परब १२ मे रोजी सावंतवाडीत सत्कार
सिंधुदुर्ग / राजू तावडे
शासनातर्फे वन्यजीव रक्षक जिल्हा सिंधुदुर्ग म्हणून नियुक्त झालेल्या श्री. संजय सावंत (वन्यजीव तज्ज्ञ, तिलारी,दोडामार्ग) आणि श्रीमती भाग्यश्री परब (पक्षीतज्ज्ञ,रानबांबूळी) यांचा सत्कार मंगळवार दिनांक १२ मे रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हाॅलमध्ये आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी दिली. यावेळी “जैवविविधता आणि सिंधुदुर्गातील वन्यजीवन” या विषयावर एक परिसंवाद आयोजित केला आहे.
हत्ती, गवेरेडे, बिबटे, माकडे, सांबर इत्यादी वन्यप्राणी आणि ग्रामीण जीवन यामधील संघर्ष तसेच दोडामार्ग सावंतवाडी तालुक्यातील इको सेन्सिटिव्ह गावे आणि शक्तीपीठ महामार्ग या विषयांवर यावेळी विस्तृत चर्चा होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग आणि सावंतवाडी तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेले व्हिला प्रकल्प,शेकडो एकर जमीनीवर होत असलेली वृक्षतोड, जागोजागी असलेले क्रशर्स आणि क्वारीज्,मालवण कुडाळ येथील अवैध वाळूउपसा,मळेवाड आजगाव धाकोरे येथील प्रस्तावित नऊ गावातील मायनिंग प्रकल्प अशा अनेक पर्यावरण बाधक प्रकल्प यावरही चर्चा होईल.


