विजेच्या दाबामुळे पाटील कॉम्प्लेक्स परिसरात विद्युत उपकरणांचे नुकसान
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
आज सोमवारी अचानक वाढलेल्या विजेच्या दाबामुळे सावंतवाडी एसटी स्टँड समोरील पाटील कॉम्प्लेक्सच्या विद्युत डीपी परिसरातील नागरिकांच्या विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे वीज वितरण कंपनीचा गलथान कारभार समोर आला आहे. विद्युत मंडळाने आपला कारभार वेळीच सुधरावा, अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील असा संतप्त इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी वीज मंडळाला दिला आहे.
सोमवारी दुरुस्तीच्या नावाखाली शहरामध्ये संपूर्ण दिवस विद्युत पुरवठा खंडित करून ठेवला जातो. विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. कॉन्ट्रॅक्ट बेसच्या कामगारांना घेऊन वीज वितरण काम करत आहे. हे कामगार कितपत कुशल आहेत यावरही शंका निर्माण केली जात आहे. ठेकेदार पद्धतीने विजेचे काम चालू असताना बहुतेक वेळा त्यावर कोणात्याही विद्युत तज्ञ व्यक्तीची देखरेख व उपस्थिती नसते असे बऱ्याच वेळा निदर्शनास आले आहे. शहरात रात्री अपरात्री अनेक वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असतो. शहरात रात्रीच्या वेळी घोंगावणारे डास आणि वाढता उकाडा व त्यामध्ये विद्युत पुरवठा खंडित यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीने आपला गलथान कारभार वेळीच सुधारावा. अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरे जावे लागले असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विद्युत कंपनीला दिला आहे.


