मनसेच्या पाठपुराव्यामुळे बांदा प्राथ. आरोग्य केंद्रात दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी भरती नसल्यामुळे उद्भवणाऱ्या अडचणीचा सावंतवाडी मनसे तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे.
गेल्या महिन्यामध्ये मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी सावंतवाडी येथे पालकमंत्री नितेश राणे यांची भेट घेऊन त्यांना बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत त्रुटी सांगून चर्चा केली होती. याची दखल घेत पालकमंत्र्यांनी आपले आश्वासन पूर्ण करून बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी परिचारक म्हणून किरण मेस्त्री आणि सफाई कर्मचारी दिनेश शेर्लेकर यांची नेमणूक केली आहे. याबाबत श्री. मिलिंद सावंत यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.
आज सोमवारी दोन्ही कर्मचारी कामावर रुजू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत, बांदा शहराध्यक्ष चिन्मय नाडकर्णी, नंदू बांदेकर , अशोक परब, देसाई व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मनसेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी सई धुरी यांचे हि आभार व्यक्त करण्यात आले.


