न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत पवार यांच्या पार्थिवावर सैनिकी शिस्तीत अंत्यसंस्कार

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

देशसेवेचा वारसा लाभलेले सन १९६५ व १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील वीरयोद्धे, सातार्डा येथील निवृत्त सैनिक हवालदार चंद्रकांत जयराम पवार (वय ८२) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी सातार्डा येथील तरचावाडा वैकुंठ स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनाने सातार्डा परिसरासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हळहळ व्यक्त होत आहे.
चंद्रकांत पवार हे लहान वयातच भारतीय सैन्यात दाखल झाले होते. त्यांनी ‘आर्मी सर्व्हिस कोर’ (ASC) मध्ये २६ वर्षे देशसेवा केली. सैन्यदलातून हवालदार पदावरून निवृत्त झाल्यानंतरही त्यांनी राज्य परिवहन महामंडळात (MSRTC) बस चालक म्हणून १५ वर्षे सेवा बजावली. या काळात त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागीय कार्यालयांतर्गत देवगड, मालवण, कुडाळ, सावंतवाडी आणि वेंगुर्ले अशा विविध डेपोमध्ये आपली सेवा दिली होती.
सैन्यातून निवृत्त होऊन अनेक वर्षे झाली तरी त्यांच्यातील ‘सैनिक’ कायम जिवंत होता. दरवर्षी स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी ते सातार्डा ग्रामपंचायतीच्या ध्वजारोहण कार्यक्रमाला न चुकता उपस्थित राहत. वयाच्या ८२ व्या वर्षीही ते अगदी कडक इस्त्रीचा युनिफॉर्म, पॉलिश केलेला बेल्ट आणि बूट घालून सैनिकी थाटात ध्वजाला कडक सॅल्यूट देत असत. देशसेवेसोबतच समाजसेवेतही ते नेहमी अग्रेसर असत. गावातील सार्वजनिक रस्ता व्हावा, यासाठी त्यांनी थेट उपोषण आंदोलन करण्याचीही तयारी दर्शवली होती.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सातार्डा येथील निवासस्थानी ठेवण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.
सावंतवाडी नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ये, निवृत्त अधिकारी राजा वाडीकर, निवृत्त मालवण गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, निवृत्त गोवा उपजिल्हाधिकारी काशिनाथ सातार्डेकर, पणजी महा नगरपरिषदेचे दीपक सातार्डेकर, हुमरस पोलीस पाटील सुरेश चव्हाण, निवृत्त हायस्कूल मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर, नारायण बागकर, ज्येष्ठ नागरिक प्रभाकर मांजरेकर, गजानन शिरसाट, धनंजय केरकर, चर्मकार समाजाचे बांधव पी.बी.चव्हाण, संत रोहिदास सहकारी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन बाबुराव चव्हाण, गणेश म्हापणकर, दिलीप इन्सुलकर, सुभाष बांबुळकर, उत्तम चव्हाण, महेश चव्हाण, महेश मोचेमाडकर, संदेश मोचेमाडकर,एकनाथ चव्हाण, विजय होडावडेकर,सुधाकर बांदेकर, अशोक चव्हाण, कृष्णा आसोलकर, योगेश्वर कडू, अविनाश होडावडेकर, संग्राम मोरे,अशोक पिळणकर, सतिश काळसेकर संतोष पवार,सत्यदीप सातार्डेकर तुळशीदास पवार,शेखर पवार,सेंट्रल बँकेचे शाखा व्यवस्थापक श्री. सावंत, पोलीस अधिकारी शेखर दाभोलकर आदींसह शेकडो नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांना समाज बांधवांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
दिवंगत चंद्रकांत पवार यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, जावई, बहिणी, भाऊ, वहिनी, पुतणे, नातवंडे आणि पतवंडे असा मोठा परिवार आहे. पत्रकार हरिश्चंद्र पवार व इंजिनिअर जयराम (बाळा) पवार यांचे वडील होत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे