विज अधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ, मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. केसरकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे जिल्हावासीय हैराण झाले आहेत. विज अधिकाऱ्यांकडून पालकमंत्र्यांच्या आदेशाला हरताळ फासण्यात आल्याची टीका मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी पेक्षा यावर्षी उष्मा वाढलेला असून सुर्य आग ओकत असताना वीजवितरण खात्याचे अधिकारी सुशेगात असल्याप्रमाणे वागत आहेत. दिवस रात्र कोणतेही कारण नसताना वारंवार विज खंडित होत असून यामुळे नागरिक, व्यापारी, उद्योजक यांना मोठा त्रास सहन करावा लागत असून आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. पावसाला अजून सुरूवात झालेली नाही त्यामुळे आतापासून जर हि अवस्था आहे तर भर पावसात कोण कोणत्या समस्यांना जनतेला तोंड द्यावे लागेल त्याची कल्पना करवत नाही, असे केसरकर म्हणाले.
नुकतीच पालकमंत्री नितेश राणे यांनी वीजमंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेवून वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याबाबत अधिकारी वर्गाला जबाबदार धरून कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला होता. मात्र वीजवितरण खात्याच्या अधिकारी वर्गाने या आदेशाला केराची टोपली दाखवली असून दिवसभरात दहा ते पंधरा वेळा कोणतेही नैसर्गिक कारण नसताना वारंवार विज खंडित होत आहे. त्यामुळे पालकमंत्री नितेश राणे यांनी आता याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी किंवा दिवसभर सतत व विनाकारण खंडित होणाऱ्या वीजेच्या समस्येवर तरी ठोस उपाययोजना करावी असे आवाहन मनसे तर्फे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी केले आहे.


