बांदा ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या, अन्यथा आंदोलन…. वासुदेव भोगले यांचा इशारा
सिंधुदुर्ग / राजू तावडे
बांदा ग्रामपंचायत कार्यालयासाठी कायमस्वरूपी ग्रामसेवक देण्याची मागणी बांदा शहर विकास आघाडीचे श्री. वासुदेव विजय भोगले यांनी गटविकास अधिकारी सावंतवाडी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बांदा ग्रामपंचायत कार्यालयात सध्या नियमित ग्रामसेवक उपलब्ध नसल्यामुळे ग्रामपंचायतीची प्रशासकीय कामे तसेच नागरिकांची विविध शासकीय कामे रखडली जात आहेत. यामुळे ग्रामस्थांना दाखले मिळविणे, विविध योजनांचे अर्ज, ग्रामपंचायत अभिलेख व इतर आवश्यक सेवांसाठी वारंवार अडचणींचा सामना करावा लागत आहे.
बांदा ही मोठी ग्रामपंचायत असूनही येथे दररोज मोठ्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात येत असतात. मात्र ग्रामसेवक उपलब्ध नसल्याने विकास कामे आणि दैनंदिन प्रशासनावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. बांदा ग्रामपंचायतीमध्ये मागील पाच वर्षात पाच उपसरपंचांची नियुक्ती झाली परंतु ग्रामपंचायती नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती अद्याप झालेली नाही. कोट्यावधी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या मोठ्या ग्रामपंचायततील ही अवस्था अत्यंत लाजिरवाणी असून प्रशासन व सत्ताधाऱ्यांसाठी हि खेदजनक बाब असल्याचे श्री. भोगले आणि म्हटले आहे.
ग्रामसेवकांच्या अनुपस्थितीमुळे नागरिकांमध्ये प्रशासनाबाबत नाराजी निर्माण होत आहे. तरी निवेदनाची तात्काळ दखल घेऊन बांदा ग्रामपंचायत साठी कायमस्वरूपी नियमित ग्रामसेवकाची नियुक्ती करावी, अन्यथा ग्रामस्थांना याप्रकरणी लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल असा इशारा वासुदेव भोगले यांनी दिला आहे.


