कर्नाटकात उद्या डी.के. शिवकुमार यांचा शपथविधी… सर्व धर्मांचे गुरू उपस्थित राहणार
बेंगळुरू/ विनूथा के आर
कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार बुधवारी साधेपणाने शपथ घेतील. सर्व धर्माच्या गुरुंची उपस्थिती हे या सोहळ्याचे वैशिष्ट्य राहील. उद्या, बुधवारी सायंकाळी ४ वाजून ५ मिनिटांनी राजभवन येथील ग्लास हाऊसमध्ये होणाऱ्या सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसमेवत ज्येष्ठ १८ ते २० मंत्री शपथ घेतील, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
शिवकुमार यांनी मला सर्व धर्माच्या गुरुंच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायची आहे, असे स्पष्ट करुन हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजातील धर्मगुरुंना सोहळ्याला उपस्थित राहून मला आशीर्वाद देण्यासाठी आमंत्रित केले आहे.
प्रामुख्याने सुत्तूर मठाचे शिवरात्री देशिकेंद्र महास्वामी, आदिचुंचनगिरी महासंस्थान मठाचे निर्मलानंदनाथ महास्वामी, सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग महास्वामी, विश्व वक्कलिगा महासंस्थान मठाचे निश्चलानंदनाथ महास्वामी, गुरु ब्रह्मस्वर मठाचे नंजावधूत महास्वामी, करि वृषभ देशिकेंद्र शिवयोगी महास्वामी, शिवमूर्ती शिवाचार्य महास्वामी, रंभापुरीपीठाचे प्रसन्न रेणुका वीरसोमेश्वर शिवाचार्य स्वामी, उज्जयिनी पीठाचे सिद्धलिंग राजदेशिकेंद्र महास्वामी, केदारपीठाचे केदारनाथ भीमाशंकर शिवाचार्य महास्वामी, श्रीशैलपीठाचे श्रीशैल श्री चेन्नसिद्धराम शिवाचार्य महास्वामी, कनक गुरुपीठ, कागिनेलेचे निरंजननंदपुरी स्वामी, भोवी गुरुपीठ चित्रदुर्गचे इम्मडी सिद्धरामेश्वर स्वामी, मादार चन्नय्या गुरुपीठाचे बसवमूर्ती मादार चन्नैयास्वामी, पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थ महास्वामी, श्री रविशंकर गुरुजी, दिगंबर जैन मठाचे स्वस्तिश्री भट्टारक महास्वामी, वीरभद्र चन्नमल्ला महास्वामी, महाबोधी सोसायटीचे आनंद भिक्कू, कॅथलिक चर्चचे फादर आर्च बिशप डॉ. पीटर मचाडो, सय्यद मोहम्मद अली अल हुसेन, दर्गाह हजरत हाफिज डॉ. हजरत खाजा बंदेनवाज यांना शिवकुमार यांच्या कार्यालयातून त्यांच्या स्वाक्षरीचे विनंतीपत्र आणि निमंत्रण पाठवण्यात आले आहे.


