शिवराज्याभिषेक हा पहिला स्वातंत्र्यदिन : युवराज संभाजीराजे….. किल्ले रायगडावर ३५२वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न
किल्ले रायगड/ संतोष मुळीक
पाचाड येथील राजमाता जिजाऊसाहेब यांच्या समाधीस्थळास अभिवादन करून ३५२व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली. त्यानंतर नाणेदारवाजामार्गे पारंपरिक पायी गड चढाई करण्यात आली. आज सकाळी शिवमुर्तीवर दुग्धाभिषेक करून विधिवत पूजा करीत शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाला.
तत्पूर्वी ५ जून (सायंकाळी व रात्री) नगारखाना येथे गडपूजन झाले. ‘धार तलवारीची युद्धकला महाराष्ट्राची’ या मर्दानी खेळांच्या प्रात्यक्षिकांचे उद्घाटन, राजसदरेवर शाहिरी कार्यक्रम आणि जगदीश्वर मंदिरात कीर्तन-भजन पार पडले.शिरकाई देवी चा गोंधळ घातला गेला.तर जगदिश्वर मंदीरात वारकरी संप्रदायाकडून भजन कीर्तन कार्यक्रम पार पडला.
आज सकाळी ७:०० वाजल्यापासून नगारखाना येथे विधीवत ध्वजारोहण करण्यात आले.
आज सकाळी १० वाजता शिवछत्रपतींच्या पालखीचे राजसदर येथे भव्य आगमन झाले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या उत्सवमूर्तीवर मुख्य अभिषेक आणि सिंहासनारूढ मूर्तीवर सुवर्ण मुद्रांचा अभिषेक करण्यात आला. दुपारी १च्या आसपास शिवराजेश्वर समाधीस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी संबोधित करताना युवराज संभाजीराजे यांनी आपण १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा करतो मात्र खरा स्वातंत्र्यदिन शिवराज्याभिषेक होय. असे सांगत शिवरायांच्या आज्ञेनुसार वागा असे आवाहन केले.
दरवर्षी प्रमाणे रायगड जिल्हा प्रशासनाने तसेच पोलीस दलाने योग्य नियोजन करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. तर उपस्थित मावळ्यांनी मिळेल तिथे पावसाच्या सरींची तमा न बाळगता विश्रांती घेतली. या सोहळ्याला महाराष्ट्रातून तसेच देश विदेशातील शिवप्रेमींनी हजेरी लावली होती. तर सातारा, कोल्हापूर येथील शिवभक्तांची उपस्थित लक्षणीय होती.


