छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त ओटवणे येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला भाजपा युवा नेते विशाल परब आणि सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दुग्धाभिषेक करून आज शनिवारी अभिवादन केले.
सावंतवाडी तालुक्यातील ओटवणे (देऊळवाडी) येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सिंहासनाधिष्ठित शिवरायांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक करून अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
या कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून भाजपा युवानेते विशाल प्रभाकर परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनील निरवडेकर, भाजपा युवामोर्चा अध्यक्ष हितेन नाईक उपस्थिती होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ॲड. अनील निरवडेकर आणि विशाल परब यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा इतिहास, स्वराज्य निर्मितीतील त्यांचे योगदान याविषयी माहिती देऊन आजच्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
“ज्याप्रमाणे ओटवणे येथील श्री देव रवळनाथ मंदिरासमोर सभामंडप उभारण्यासाठी मी सहकार्य केले, त्याचप्रमाणे या ठिकाणीही सभामंडप उभारण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करेन ” असे आश्वासन यावेळी विशाल परब यांनी ग्रामस्थांना दिले.
या कार्यक्रमाला भाजपा सोशल मीडिया प्रमुख केतन आजगांवकर, माजी पोलिस पाटील तुकाराम गावकर, ओटवणे हायस्कूलचे मुख्याध्यापक होडावडेकर, चेतन गावकर तसेच या उपक्रमासाठी विनामूल्य जागा उपलब्ध करून देणारे वैभव भानसे, धिरेंद्र म्हापसेकर, रामा गावकर, चंद्रकांत गावकर, विजय कविटकर, नारायण भानसे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमामुळे शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर पुन्हा एकदा करण्यात आला.


