अन्नाची नासाडी करू नकात… एक बैल अपघाती गेला म्हणून गरीब शेतकरी महिलेची स्वतःला जुंपून दुसऱ्या बैलाला मदत
लातूर /
देवणी तालुक्यातील बोंबळी येथील एका शेतकरी कुटुंबाची विदारक परिस्थिती समोर आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बैल दगावल्याने शेतीची कामे ठप्प होऊ नयेत म्हणून शेतकऱ्याच्या पत्नीने दुसऱ्या बैलाच्या जागी स्वतःला औताला जुंपून घेतले. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना देवणी येथील बोंबळी गावात घडली. स्वतःला औताला जुंपून औत ओढणाऱ्या या वृद्ध महिलेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हौसाबाई काशीनाथ गायकवाड असे या महिलेचे नाव असून, देवणी तालुक्यातील बोंबळी येथील शेतकरी काशिनाथ पुंडलिक गायकवाड यांच्या त्या पत्नी आहेत.
शेतात काही दिवसांपूर्वी त्यांचा एक बैल वीज पडून मृत्यूमुखी पडला. खरीप हंगामातील पेरणीची वेळ सुरू असताना दुसरा बैल खरेदी करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नसल्याने अखेर कुटुंबाने स्वतःच शेतीची मशागत करण्याचा निर्णय घेतला. या वेळी काशीनाथ गायकवाड नांगर हाकत असताना त्यांच्या पत्नी हौसाबाई काशीनाथ गायकवाड यांनी दुसऱ्या बैलाच्या जागी औत ओढण्याचे काम केले. वृद्धापकाळातही शेती वाचवण्यासाठी या दाम्पत्याचा संघर्ष सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील कठोर वास्तव अधोरेखित करणारे हे दृश्य सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. हलाखीच्या परिस्थितीत असलेल्या गायकवाड कुटुंबाला मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.


