सोलापूरजवळ टेम्पो विहिरीत पडून १४ जणांचा मृत्यू
सोलापूर/
सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे
समोर आलेल्या माहितीनुसार, माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ पिकअप वाहन विहिरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यात पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील १४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा समावेश आहे. गावाकडे परत येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावानजीक हा अपघात झाला आहे.
या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. ही विहीर रस्त्याच्या कडेला होती. भाविकांसह पिकअप वाहन या विहिरीत कोसळले. ही विहीर पाण्याचे तुडुंब भरलेली होती. या विहिरीला कोणतेही कठडे नव्हते, त्यामुळे पिकअप थेट पाण्यात गेले आणि या अपघातात १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील ८ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असल्याचीही माहिती समोर आली आहे.


