पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सिंचन व्यवस्थापनात सहभाग वाढवा, कार्यकारी अभियंता महाले
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
पाणी वापर संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा सिंचन व्यवस्थापनातील सहभाग वाढवून पाण्याचे शाश्वत, समन्यायी व कार्यक्षम वितरण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम नेतृत्व निर्माण होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले यांनी केले.
सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, आंबडपाल अंतर्गत पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी, चराठा येथे नुकतेच पाणी वापर संस्था (WUA) अध्यक्ष व संचालकांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. महाले बोलत होते.
. कार्यशाळेच्या प्रारंभी भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या या महान अभियंत्यांच्या प्रतिमेस कार्यशाळेचे अध्यक्ष तथा कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले होते. श्री. म. बा. डांबरेकर, उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. रे. भ. भारस्वाडकर, सेवानिवृत्त प्राध्यापक (वाल्मी), छत्रपती संभाजीनगर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन पाटबंधारे उपविभाग सावंतवाडी व श्री. गणेश घाणेकर (NGO) यांनी संयुक्तपणे केले.
सावंतवाडी, कुडाळ व दोडामार्ग तालुक्यातील शिरवळ, आंबोली, सनमटेंब सांगेली, निळेली, पुळस, हातेरी व ओरोस येथील लघु पाटबंधारे प्रकल्पांच्या पाणी वापर संस्थांचे अध्यक्ष, संचालक व प्रतिनिधींनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या प्रशिक्षण कार्यशाळेच्या औचित्याने सनमटेंब-सांगेली, पुळस व हातेरी येथील नव्याने नोंदणीकृत पाणी वापर संस्थांना कार्यकारी अभियंता श्री. संदीप महाले व उपविभागीय अधिकारी श्री. म. बा. डांबरेकर यांच्या हस्ते नोंदणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
प्रशिक्षणामध्ये पाणी वापर संस्थांच्या संचालकांचे कर्तव्य व जबाबदाऱ्या, महाराष्ट्र व्यवस्थापित सिंचन प्रणाली अधिनियम २००५ व नियम २००६, पाण्याचे समन्यायी वितरण, पाणीपट्टी व आर्थिक व्यवस्थापन तसेच दफ्तर व अभिलेख व्यवस्थापन या विषयांवर डॉ. भारस्वाडकर यांनी सखोल व व्यवहार्य मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ. कांचन बामणे, कनिष्ठ अभियंता तसेच श्री. एल. एम. डूबळे, सेवानिवृत्त उपअभियंता यांनी केले. आभार श्री. म. बा. डांबरेकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. शैलेश परब, श्री. महेश आंदुर्लेकर (कनिष्ठ अभियंता) तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.


