दहावीत ९९.८०% गुण घेत विराज राऊळ जिल्ह्यात द्वितीय, फेरतपासणीत ४ गुणांची वाढ
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
दहावीच्या परीक्षेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस हायस्कूलचा विद्यार्थी कु. विराज नंदकिशोर राऊळ याच्या गुणपत्रिका फेर तपासणीत तब्बल ४ गुणांची वाढ झाल्यामुळे त्याने जिल्ह्यात पाचव्या क्रमांकावरून द्वितीय क्रमांक पटकावला आहे. त्याचे ९९.८० टक्के झाले असुन अवघ्या एका गुणामुळे १०० टक्क्यासह त्याचा जिल्ह्यातील प्रथम क्रमांक हुकला आहे.
सुरुवातीला ८ मे रोजी जाहीर झालेल्या निकालात कु. विराज राऊळ याला ९९ % गुण मिळाल्याने त्याने सावंतवाडी तालुक्यात ३ रा तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५ वा क्रमांक पटकावला होता. मात्र या गुणांबाबत कु विराज राऊळ याला साशंकता होती. त्याने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी केली. या फेरतपासणीत संस्कृत विषयात ३ गुण आणि भूगोल विषयात १ गुण मिळून त्याचे तब्बल ४ गुण वाढले. त्यामुळे आता त्याला ५०० पैकी ४९९ गुण म्हणजेच ९९.८० % गुण मिळाल्याने तो सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुसरा आला आहे.
विराज राऊळ हा मूळचा मळगांवचा सुपुत्र असून ओटवणे हायस्कूलचे शिक्षक नंदकिशोर राऊळ यांचा मुलगा तर शिवसेना माजगांव जिल्हा परिषद मतदारसंघ विभागप्रमुख उमेश गांवकर आणि पत्रकार दीपक गावकर यांचा भाचा. विराजच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.


