योग ही भारताची जगाला दिलेली अमूल्य देणगी; सीताराम गावडे
सिंधुदुर्ग / राजू तावडे
“योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य देणगी असून तो केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्याचा प्रभावी मार्ग आहे, असे प्रतिपादन सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे यांनी केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ऑर्बिट योगा स्टुडिओ, सावंतवाडी यांच्या वतीने धनश्री मंगल कार्यालय येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडीच्या नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले होत्या. व्यासपीठावर तहसीलदार श्रीधर पाटील, डॉ. ज्ञानेश्वर दुर्भाटकर, डॉ. चौगुले, संदीप कुडतरकर , लखमराजे भोसले उपस्थित होते.
सीताराम गावडे म्हणाले, ऑर्बिट योगाचे संचालक विनेष तावडे आणि प्रशिक्षक संचालक अमोल सोनावणे यांनी एका छोट्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे सावंतवाडीत योग चळवळ अधिक व्यापक होत असून त्याचा अभिमान वाटतो. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ सर्वांनी घ्यावा व आपले आरोग्य निरोगी ठेवावे,” असे आवाहन श्री. गावडे यांनी केले.
यावेळी वक्त्यांनी नियमित योगाभ्यासाचे महत्त्व विशद करताना सांगितले की, योगामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते आणि एकाग्रता वाढते. आजच्या धकाधकीच्या जीवनात तणाव, चिंता आणि विविध आजारांपासून दूर राहण्यासाठी योग अत्यंत उपयुक्त ठरतो. योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून सकारात्मक विचारांची जडणघडण होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोसले व तहसीलदार श्रीधर पाटील यांनीही उपस्थितांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात संगीताच्या ठेक्यावर आकर्षक योग प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. सहभागींच्या उत्कृष्ट सादरीकरणाचे मूल्यमापन करून त्यांना क्रमांक देत गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी निवृत्त शिक्षक भरत गावडे, सहायक पोलिस निरीक्षक जयेश खंदरकर, धनश्री कार्यालयाचे मालक बाळू कशाळीकर, तहसीलदार श्रीधर पाटील आणि सीताराम गावडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.


