उष्णतेच्या लाटेचे युरोपात १३००पेक्षा जास्त बळी
पॅरिस/ वृत्तसंस्था
युरोपमधील २६ देशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. युरोपमध्ये यंदा रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. नैऋत्य युरोपातून सुरू झालेल्या उष्माची झळ आता पूर्व युरोपला बसू लागली आहे. फ्रान्स , इटली, स्पेन, पोलंड, झेक प्रजासत्ताक आणि लिथुआनिया यांच्यासह अनेक देशांमध्ये पारा ४० डिग्री सेल्सिअसवर पोहोचला आहे. उष्माघातानं युरोपात आतापर्यंत कमीत कमी १३०० जणांचा मृत्यू झाला आहे. एकट्या फ्रान्समध्ये हा आकडा १००० पेक्षा अधिक जास्त आहे. हा आकडा वाढण्याची भीती जागतिक आरोग्य संघटनेनं वर्तवली आहे
फ्रान्समध्ये उष्णतेची समस्या सर्वाधिक तीव्र आहे. फ्रान्सची सार्वजनिक आरोग्य संस्था सेंट पब्लिक फ्रान्सनं रविवारी २४ जूननंतर देशात जवळपास १ हजारहून अधिक मृत्यूंची नोंद केली आहे. गेल्या आठवड्यातील ३ दिवसांत उष्मा प्रचंड वाढला. तेव्हा प्रामुख्यानं अनेकांचा मृत्यू झाला. मृतांमधील ८५ टक्के जणांचं वय ६५ वर्षांहून अधिक आहे. पॅरिस आणि इले-डी-फ्रान्स परिसरांना सर्वाधिक फटका बसला आहे. सर्वात चिंताजनक बाब म्हणजे घरात होणाऱ्या मृत्यूंचा आकडा ४० टक्क्यांहून अधिक आहे. म्हणजेच लोक रुग्णालयात पोहोचू शकले नाहीत. त्यांचा घरातच मृत्यू झाला.
फ्रान्सच्या आरोग्य यंत्रणेनं धोक्याचा इशारा देत मृत्यूंचा आकडा वाढण्याची भीती वर्तवली आहे. रुग्णालय, नर्सिंग होम्स आणि घरांमध्ये होणाऱ्या मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी फ्रान्समध्ये अनेकांनी नदी, तलाव आणि जलाशयांचा आधार घेतला. या जलस्रोतांमध्ये बुडून मरण पावलेल्यांची संख्या ७४ इतकी आहे.. रेल्वे रुळ, रस्ते वितळले.
फ्रान्सचं सरासरी तापमान २९.८ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. १९४७ पासून देशात तापमान मोजण्यास सुरुवात झाली. तेव्हापासून पहिल्यांदाच इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. फ्रान्सचे ४४ कोटी लोक (देशाची जवळपास संपूर्ण लोकसंख्या) भीषण उकाड्याचा सामना करत आहेत


