जिल्ह्यातील अंमली पदार्थांच्या साठ्यांवर कारवाई केव्हा? डॉ. जयेंद्र परुळेकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
गेल्या दोन तीन आठवड्यात महाराष्ट्रामध्ये भेसळयुक्त दुध, दुग्धजन्य पदार्थ तसेच मावा मिठाई तसेच एमडीएमए या सिंथेटिक प्रकारच्या अंमली पदार्थांच्या साठ्यांवरही मोठी कारवाई झालेली आहे. अन्न औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यतत्पर कारवाईमुळेच हे शक्य झाले आहे.
पण याच कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुध भेसळ, भेसळयुक्त मावा, पनीर या वर कुठेही मोठी कारवाई झाल्याचे ऐकिवात नाही.
हजारो लिटर्स दुध परजिल्ह्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दररोज येत असते तसेच जागोजागी मिठाईची दुकाने आहेत, अशावेळी सगळे आलबेल आहे असा याचा अर्थ आहे का? असा सवाल अन्न सुरक्षा समिती,सिंधुदुर्गचे सदस्य डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे.
एमडीएमए अंमली पदार्थ तर जिल्ह्यातील शाळा,काॅलजच्या परिसरात अनेक ठिकाणी उपलब्ध होते. आज अख्खी पिढी बरबाद होत आहे. मग त्यांचे विक्रेते,साठे करणारे पकडले का गेले नाहीत?
. अन्न आणि औषध जिल्हा प्रशासनामध्ये कर्मचारी, ड्रायव्हर अशी अनेक पदं रिक्त अजूनही भरलेली नाहीयेत.अन्न सुरक्षा जिल्हा प्रशासनाकडे तर स्वतःची गाडी, ड्रायव्हरच नाही. महत्त्वाचे म्हणजे पकडलेल्या भेसळयुक्त अन्नाची तपासणी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातच काय तर संपूर्ण कोकणात एकही तपासणी लॅब नाही. असा दावा डॉ. परूळेकर यांनी केला आहे.
जो पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वतंत्र तपासणी लॅब येणार नाही तोपर्यंत तुकाराम मुंढे साहेबांसारखे कितीही कर्तव्यतत्पर कडक आयुक्त जरी आले तरी भेसळ करणारे कधीही गजाआड जाणार नाहीत, अशी खंत डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी व्यक्त केली.


