सिंधुदुर्ग बँकेचे सेवानिवृत्त अधिकारी राऊळ यांच्याकडून सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानला देणगी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सावंतवाडीचे सेवानिवृत्त अधिकारी मिथिलनाथ गजानन राऊळ यांनी आपल्या सेवानिवृत्तीप्रसंगी जमलेली रक्कम सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या सेवाभावी उपक्रमांसाठी दिली. प्रत्येकाला अभिमान वाटावा असे कृत्य त्यांनी केले.
सेवानिवृत्ती कार्यक्रमाप्रसंगी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना ते म्हणाले “माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला मला बुके, हार, तुरे किंवा भेटवस्तू देऊ नका तर त्यासाठी जमवलेले पैसे मला द्या. ते पैसे मी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेला त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देईन,कारण त्यांचे सेवाभावी उपक्रम हे निराधारांना आधार देणे, रुग्णांना सेवा देणे, तसेच समाजामध्ये माणुसकी जिवंत ठेवण्याचे महान कार्य त्यांच्या हातून घडत आहे. त्यांच्या अशा उपक्रमांना आपण सुद्धा थोडा फार हातभार लावूया जेणेकरून गोरगरिबांच्या आशीर्वाद आपल्याला मिळतील.
मिथिलनाथ गजानन राऊळ हे बिबवणे कुडाळचे रहिवाशी. गेली 33 वर्षे सिंधुदुर्ग बँक कर्मचारी ते अधिकारी या पदावर त्यांनी काम केले. 4 वर्षे त्यांनी सावंतवाडी शाखेत वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले.
यावेळी शाखा व्यवस्थापक श्रीधर शिंदे म्हणाले, राऊळ यांच्यासारखे अधिकारी आमच्या बँकेला लाभले हे आमचे भाग्यच आहे. त्यांच्याकडून खूप काही गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या. आजपर्यंत ते कधीही कोणाशी वरच्या आवाजात बोलले नाही तर काही कुणाचं चुकत असेल तर शांतपणे ते त्यांना समजावून सांगत असत. एक साधा व सरळ आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे नेहमी पाहत आलो.
बँकेचे संचालक श्री महेश सारंग म्हणाले, राऊळ आज निवृत्त झाले असले तरी अशा अधिकाऱ्यांची आमच्या बँकेला आवश्यकता आहे याबाबत आपण लवकरच अध्यक्षांशी बोलणार आहे.
याप्रसंगी बँकेचे संचालक महेश सारंग, शाखा व्यवस्थापक श्रीधर शिंदे, मधुकर देसाई, संदीप धारगळकर, प्रा.सचिन पाटकर, वीरेंद्र धुरी, सदाशिव आडवे, कादर शेख, प्रकाश ठाकूर, बँक कर्मचारी तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव, रूपा मुद्राळे व लक्ष्मण कदम उपस्थित होते.


