मुंबईसह ठाण्यात आजही मुसळधार पाऊस… आजचा दिवस बाहेर न पडण्याचे आवाहन
मुंबई / वृत्तसंस्था
मुंबईमध्ये तर सतत पाऊस कोसळत आहे. त्यामध्येच आजही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. आज भारतीय हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला. गेल्या दोन दिवसांपासून सतत पाऊस सुरू असून थांबण्याचे नाव घेत नाही. नुकताच मंत्रालयाकडून मुंबईसह उपनगरे, पालघर आणि ठाण्यात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा पुढील 3 तासांसाठी दिला आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली. अंधेरीचा सबवे बंद आहे. पूर्ण पाणी तिथे साचले आहे. काल अनेक भागात झाड कोसळण्याच्या घटना घडल्या. दक्षिण मुंबई परिसरात जोरदार पावसाला सुरवात झाली. गेल्या काही दिवसांपासून मुंबई शहर आणि उपनगर परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. प्रशासनाने मुंबईकरांना अतिमहत्वाच्या कामांशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले.
ठाण्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. काल रात्रीपासून पावसाची संतातधार सुरु होती. काल रात्री 12 वाजल्या पासून 26 मिलिमिटर पावसाची नोंद झाली तर दिवसभरात 84 मिलिमिटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर ठाण्यात मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसामुळे अंधेरी परिसरात अनेक भागात पाणी साचले आहे. हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे लोकल १५ ते २० मिनिटे उशिराने धावताना दिसत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यालाही ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने केला. कोकणात तर पावसाचा धुमाकूळ बघायला मिळतोय. पुढील काही दिवस पाऊस अशाचप्रकारे सुरू राहण्याचा अंदाज आहे. पुढील 4 दिवसांकरिता पावसाचा मोठा इशारा हवामान विभागाने दिला. राज्यात पावसाचा जोर वाढत आहे
राज्यातील इतरही भागात पाऊस सुरू आहे. बीड, हिंगोली, जालना, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.


