पाणीच पाणी चहूकडे बाई गेला रस्ता कुणीकडे… रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुंबई गोवा महामार्ग पाण्यात
रायगड /प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने माणगाव, लोणेरे, नागोठणे (चिकणी) रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पहिल्या पावसापासून निर्माण झालेली ही समस्या अद्याप कायम असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुचाकी, रिक्षा, कार आणि अवजड वाहने मार्ग काढत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने किरकोळ वादही होत आहेत. वारंवार ही परिस्थिती उद्भवत असतानाही महामार्ग प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याचा तातडीने निचरा करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


