न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका, पत्रकार संतोष राऊळ यांचे विद्यार्थ्यांना आवाहन 

सिंधुदुर्ग  / राजू तावडे 

“मी याच शाळेत शिकलो आणि आज इथपर्यंत पोहोचलो, याचे सर्व श्रेय माझ्या शिक्षकांना आणि या शाळेला जाते,” कधीकाळी मी विद्यार्थी असताना तुमच्यासारखाच शेवटच्या बेंचवर बसायचो. परिस्थिती गरीब होती, मात्र मनात ध्येय गाठायची जिद्द आणि चिकाटी होती. खेडेगावातील विद्यार्थी कणखर असतो आणि त्याला गरिबीची जाणीव असते. त्यामुळे कोणतेही यश मिळवायचे झाले तर प्रामाणिकपणा आणि मेहनत अधिक महत्त्वाची असते. तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी मोठे यश मिळवू शकतो. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्ने पाहा, वेळेची बंधने पाळा. स्वतःमधील आत्मविश्वास कधीही ढळू देऊ नका. असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ यांनी केले.

कलंबिस्त इंग्लिश स्कूल कलंबिस्त येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (एसएससी) परीक्षा २०२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा ‘विद्यार्थी गुणगौरव समारंभ’ अत्यंत उत्साहात संपन्न झाला. यावेळी उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या कुमारी माधुरी महेश राऊळ, सानवी नीलकंठ गुरव आणि कुमारी सानिका ज्ञानदेव राऊळ या प्रमुख तीन गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

या सोहळ्यासाठी ज्येष्ठ पत्रकार तथा सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व विद्येची देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्रमुख अतिथी संतोष राऊळ यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

आजच्या मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात वाचनाचे महत्त्व अधोरेखित करताना श्री. राऊळ यांनी विद्यार्थ्यांना ‘वाचाल तर वाचाल’ असा संदेश दिला. व्यक्तिमत्व विकासासाठी थोर व्यक्तींची पुस्तके, कादंबऱ्या वाचणे गरजेचे असून अभ्यासासोबतच खेळ आणि वाचनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या शैक्षणिक यशाचा योग्य सन्मान करून त्यांना पुढील उच्च शिक्षणाच्या वाटचालीसाठी नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रशालेचे मुख्याध्यापक अभिजित जाधव यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले.

या सोहळ्याला संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, शाळेचे मुख्याध्यापक अभिजीत जाधव, संचालक शशिकांत धोंड, सूर्यकांत राजगे, वसंत सावंत, कलंबिस्त गावचे माजी सरपंच ,माजी शिक्षक शरद नाईक, सांगली केंद्रप्रमुख अवधूत जाधव, निवृत्त चतुर्थ श्रेणी कर्मचारी रामचंद्र सावंत, माजी विद्यार्थी राजेश गोवेकर, जयेंद्र राऊळ यांच्यासह शिक्षक शरद सावंत, धनराज सदगुरे, विनिता कविटकर,प्रकाश पावरा, चैताली राऊळ, रविकांत सावंत, संजना तायशेटे व शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर वालावलकर यांनी केले, तर आभार विलास चव्हाण यांनी मानले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे