पालकमंत्री नितेश राणे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित; प्रांताधिकाऱ्यांच्या बदलीची ग्वाही
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
देवगड येथे बीएलओ प्रशिक्षणादरम्यान कणकवलीचे प्रांताधिकारी जगदीश कातकर यांनी कर्मचाऱ्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी समन्वय समिती, सिंधुदुर्गच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील तब्बल २६ कर्मचारी संघटना एकवटल्या. या आंदोलनाची दखल घेत पालकमंत्री नितेश राणे यांनी समन्वय समितीच्या शिष्टमंडळाशी कणकवली येथे सविस्तर चर्चा केली. सकारात्मक तोडगा निघाल्याने आंदोलन स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली.
बैठकीत पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “कर्मचाऱ्यांचा अपमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही. अशा अधिकाऱ्यांची लवकरच उचलबांगडी होईल. हा माझा शब्द आहे.”
ते पुढे म्हणाले, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचारी आणि जनता हे माझे कुटुंब आहे. कर्मचाऱ्यांच्या सन्मानाशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. उद्धटपणे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना अजिबात पाठीशी घातले जाणार नाही.”
यावेळी समन्वय समितीचे अध्यक्ष राजन कोरगावकर, सखाराम सकपाळ, सचिव सत्यवान माळवे, नरसू रेडकर, वामन तर्फे, दिनेश म्हाडगुत, सुहास सावंत, संदीप कदम, राजू वजराटकर, जगदीश गोगटे, जयेंद्र चव्हाण, सचिन मदने, संदीप मिराशी, निकिता ठाकूर, सोमनाथ शेंगाळ, लक्ष्मण वळवी, सुशांत मर्गज, निलेश ठाकूर, टोनी म्हापसेकर, हनुमंत वाळके, सुभाष गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री नितेश राणे यांनी कर्मचारी संघटनांना आश्वस्त करत सांगितले की, भविष्यात कोणत्याही अधिकाऱ्याकडून कर्मचाऱ्यांचा अवमान झाल्यास कर्मचारी समन्वय समितीने थेट माझ्याशी संपर्क साधावा. “मला कोणत्याही अधिकाऱ्यापेक्षा कर्मचारी अधिक महत्त्वाचे आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.या प्रकरणी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून प्रांताधिकारी जगदीश कातकर यांच्या बदलीसाठी पाठपुरावा करण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
पालकमंत्र्यांनी दिलेल्या ठोस आश्वासनांवर समाधान व्यक्त करत समन्वय समितीच्या शिष्टमंडळाने आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर सर्व कर्मचारी बीएलओ व एसआयआरची कामे नियमितपणे पार पाडतील, असेही जाहीर करण्यात आले.


