वीज खंडित व स्मार्ट मीटरच्या मनमानी विरोधात ७ जुलै रोजी धरणे आंदोलन
सिंधुदुर्ग / राजू तावडे
मळगाव पंचक्रोशी व सावंतवाडी तालुक्यात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज ग्राहक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. वारंवार वीज खंडित होणे आणि वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर जबरदस्तीने बसवण्याच्या निषेधार्थ जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या वतीने मंगळवार दिनांक सात जुलै रोजी दुपारी तीन वाजता महावितरण कार्यालय सावंतवाडी येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात श्री. संजय लाड जिल्हाध्यक्ष, जिल्हा वीज ग्राहक संघटना, श्री. गणेश बोर्डीकर – उपाध्यक्ष, जिल्हा वीज ग्राहक संघटना, श्री. तावडे – पदाधिकारी, जिल्हा वीज ग्राहक संघटना, ॲड. नंदनजी वेंगुर्लेकर – जिल्हा वीज ग्राहक संघटना , श्री. संदीप गावडे – जिल्हा परिषद सदस्य, सौ. सुधा कवठणकर जिल्हा परिषद सदस्य, श्री. गौरव मुळीक उपसभापती, पंचायत समिती, सावंतवाडी पंचायत समिती मतदार संघातील सर्व सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य तसेच तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य सहभागी होणार आहेत.
वीजेच्या अनियमित पुरवठ्यामुळे शेती, लघुउद्योग तसेच घरगुती वापरकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. या गंभीर प्रश्नांवर महावितरण अधिकाऱ्यांकडून लेखी उत्तर घेण्यासाठी व स्मार्ट मीटरच्या जबरदस्तीला विरोध करण्यासाठी तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.


