आडेली लघु पाटबंधारे प्रकल्पातून १० जुलै रोजी विसर्ग, जनतेला सावधानतेचा इशारा
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील आडेली येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या धरण बांधाची सुरक्षितता लक्षात घेता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून धरणाच्या पाणीसाठ्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने दिनांक १० जुलै २०२६ रोजी साधारणपणे सकाळी ९.०० वाजता आवश्यकतेनुसार सांडव्याद्वारे नियंत्रित पद्धतीने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग,आंबडपाल-कुडाळचे कार्यकारी अभियंता स.हि.महाले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
या पाण्याचा विसर्ग केल्यामुळे धरणाच्या खालच्या बाजूस ओढा पात्रातील पाण्याच्या प्रवाहात मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विशेषतः झारप, कामळेवीर आणि आडेली गावातील सर्व नागरिकांना, शेतकऱ्यांना तसेच मासेमारी करणाऱ्या बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच ओढापात्र, पूल, बंधारे व पाण्याच्या परिसरात नागरिकांनी अनावश्यक वावर पूर्णपणे टाळावा आणि नदीपात्रात जनावरे सोडणे, मासेमारी करणे, कपडे धुणे यासारख्या कारणांसाठी नदीकाठावर जाऊ नये, अशा स्पष्ट सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.
कोणतीही जीवित अथवा वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाच्या या सूचनांचे नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित ग्रामपंचायतींनी या जाहीर सूचनेची माहिती दवंडी, ध्वनिक्षेपक व इतर उपलब्ध माध्यमांतून तातडीने नागरिकांपर्यंत पोहोचवून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देशही या प्रकटनात देण्यात आले आहेत. या जाहीर प्रकटनाची प्रत निवासी उपजिल्हाधिकारी सिंधुदुर्ग, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी, तहसीलदार वेंगुर्ला आणि संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच, तलाठी व पोलीस पाटील यांना योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.


