सम्राट संगीत सितारा २०२६’ विजेत्याचा उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांचा हस्ते सन्मान
सिंधुदुर्ग / राजू तावडे
“सावंतवाडी ही कोकणची सांस्कृतिक राजधानी आहे. सावंतवाडीला मोठा सांस्कृतिक आणि कलेचा वारसा लाभला आहे. या शहरात ‘सम्राट इंटरनॅशनल क्लब’च्या निमित्ताने संगीत, संस्कृती, कला जोपासण्याचा व त्याचे संवर्धन करण्याचा स्तुत्य उपक्रम राबवला जात आहे. अशा उपक्रमांसाठी नगरपरिषदेच्या माध्यमातून आवश्यक ती सर्व मदत केली जाईल,” असे आश्वासन सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांनी दिले. सावंतवाडी येथील ‘पर्णकुटी विश्रामगृह’ येथे आयोजित विशेष समारंभात बोलत होते.
गोवा-मये येथील सम्राट इंटरनॅशनल क्लबच्या अंतर्गत नव्याने स्थापन होत असलेल्या ‘सम्राट क्लब सावंतवाडी शहर’ च्या या सोहळ्याला मालवणी कवी दादा मडकईकर, मये सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर, सैनिक सहकारी पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील राऊळ, संचालन अर्जुन नाईक, सम्राट क्लब सावंतवाडीचे पदाधिकारी नरेंद्र देशपांडे, हरिश्चंद्र पवार, ॲड. सौ. सिद्धी परब, सौ. स्मिता केंकरे, प्रा. रूपेश पाटील, सज्जन बोरकर उपस्थित होते.
‘सम्राट संगीत सितारा २०२६’ चा मानकरी ठरलेला हर्ष नकाशे याच्यासह शास्त्रीय संगीत स्पर्धेत दैदिप्यमान यश मिळवलेल्या सिंधुदुर्गातील कु. पल्लवी पिळणकर (माणगाव, ता. कुडाळ): प्रथम फेरीतील विजेती, साहिल देसाई (मणेरी, ता. दोडामार्ग), प्रथम फेरीतील विजेता श्रुती सावंत या गुणवंत कलाकारांचा गौरव उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
प्रास्ताविकात मये सम्राट क्लबचे अध्यक्ष नरेश पेडणेकर यांनी सम्राट क्लबच्या ध्येयधोरणांचा आणि सामाजिक-सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशुतोष चिटणीस यांनी केले तर आभार सुनील राऊळ यांनी मानले.


