रत्नागिरीत ७ कोटींच्या निधीतून अत्याधुनिक शॉपिंग सेंटर उभारणार; शासनाचा निर्णय
रत्नागिरी /मेघेश मोंडकर
रत्नागिरी शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या आणखी एका महत्त्वाच्या विकासकामाची घोषणा करण्यात आली आहे. रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १५ मधील आरक्षण क्रमांक ५८ येथे अत्याधुनिक आणि भव्य शॉपिंग सेंटर उभारण्यासाठी तब्बल ७ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारण्यात येणार असून, या प्रकल्पामुळे शहरातील व्यापारी वर्गाला आधुनिक व्यवसायिक जागा उपलब्ध होणार आहे. तसेच नागरिकांनाही एकाच छताखाली दर्जेदार, सोयीस्कर आणि आधुनिक खरेदीचा अनुभव मिळणार आहे.
या प्रकल्पासाठीचा निधी महाराष्ट्र शासनाच्या ‘नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान’ या योजनेअंतर्गत थेट रत्नागिरी नगरपरिषदेला मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पाचा १०० टक्के खर्च राज्य शासन उचलणार असून, त्यामुळे नगरपरिषदेवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही.
या निधीसाठी भाजप महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका वर्षा ढेकणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडे याबाबत आग्रही मागणी केली होती. त्यानंतर आमदार चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निधीची शिफारस केली. त्यास मंजुरी मिळाल्यानंतर शासनाने अधिकृत निर्णय जारी केला आहे.
शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पारदर्शकतेवर विशेष भर दिला असून, सर्व कामे ई-निविदा (E-Tender) प्रक्रियेद्वारेच करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. काम सुरू करण्यापूर्वी जागेचे छायाचित्रण, तृतीय पक्षाकडून गुणवत्ता तपासणी (ऑडिट) आणि सर्व कामांची नोंद ठेवणे नगरपरिषदेस बंधनकारक करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकल्पावर देखरेख ठेवण्याची आणि निधीचा योग्य विनियोग होत असल्याची खात्री करण्याची जबाबदारी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. तसेच शॉपिंग सेंटरची उभारणी सार्वजनिक जागेवर आणि मंजूर विकास आराखड्यानुसारच करण्याच्या अटीही शासनाने घातल्या आहेत.
या निधीमुळे रत्नागिरी शहराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, व्यापारी आणि नागरिकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. शहरातील अनेक वर्षांपासूनची आधुनिक शॉपिंग सेंटरची गरज पूर्ण होण्याच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.


