धनादेश देवून फसवणूक केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता, आरोपी तर्फे ॲड. अनिल केसरकर यांचा युक्तीवाद
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
खात्यात पुरेशी रक्कम नसताना सुमारे ३ लाख ७६ हजार एवढ्या रक्कमेचा धनादेश देवून फिर्यादी यांची फसवणूक केल्याच्या आरोपातून प्राजक्ता आकेरकर यांची सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. एस. पी. पाटील यांनी निर्दोष मुक्तता केली. आकेरकर यांच्या वतीने ॲड अनिल केसरकर यांनी युक्तीवाद केला.
याबाबत फिर्यादी यांच्या फिर्यादी प्रमाणे थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी व प्राजक्ता आकेरकर यांचे पती यांची व्यवसायातून ओळख झाली होती.या ओळखीतून आकेरकर यांनी फिर्यादी यांच्याकडून आपल्या पतीला पैशांची गरज आहे असे सांगून एका वर्षाच्या कालावधीत सुमारे ३ लाख ७६ हजार एवढी रक्कम हातउसने म्हणून स्वीकारली होती. मात्र त्यानंतर वारंवार मागणी करून देखील आरोपी यांनी फिर्यादी यांना पैसे देण्यास टाळाटाळ केली. शेवटी आरोपी यांनी फिर्यादी यांना सदर रक्कमेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश वटविण्यासाठी फिर्यादी यांनी आपल्या खात्यात जमा केला असता सदर धनादेश आरोपी यांच्या खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने न वटता परत आला. त्यामुळे आरोपी यांनी आपल्या खात्यावरील धनादेश देवून आपली फसवणूक केली त्यामुळे आरोपी याने आपला विश्वासघात व फसवणूक केली अशी फिर्याद फिर्यादी यांच्या वतीने सावंतवाडी येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
मात्र फिर्यादी यांच्या जबाबातील विसंगती व फिर्यादी यांनी आरोपी यांना दिलेली रक्कम फिर्यादी सबळ पुराव्याच्या आधारे शाबीत करू शकला नसल्याच्या कारणाने व जो धनादेश फिर्यादी याला देण्यात आला तो अन्य कारणासाठी देण्यात आलेला होता हे आरोपी यांनी सिद्ध केल्याने आरोपी प्राजक्ता आकेरकर यांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली.


