मुंबई गोवा महामार्गावर लांजा येथे उभ्या डंपरला कारची धडक.. चौघांचा मृत्यू
रत्नागिरी/ प्रतिनिधी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथे बुधवारी १५ जुलै पहाटे झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले. गोव्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या भरधाव क्रेटा कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
हा अपघात सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास लांजा शहरातील शांतीनगर परिसरात, सरकारी विश्रामगृहाच्या पाठीमागे सुमारे ३०० फूट अंतरावर घडला. एमएच ०१ सीपी ८०२१ क्रमांकाची क्रेटा कार एमएच ०५ ईएल ३८७७ क्रमांकाच्या डंपरवर मागून आदळली. धडकेचा वेग इतका प्रचंड होता की कारचा पुढील भाग डंपरच्या मागील भागात घुसला आणि वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला. त्यामुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
या अपघातात दोन महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



