शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचा पोषण आहार, जितेंद्र गांवकर यांचा सभेत आरोप
सिंधुदुर्ग / राजू तावडे
टोका लागलेल्या कुजक्या धान्याचे पोते दाखवत शालेय विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य पोषण आहारासाठी दिले जाते, असा आरोप गुरुवारी झालेल्या सावंतवाडी पंचायत समितीच्या सभेत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गांवकर यांनी केला. यावेळी सभापती व उपसभापतीनी ताबडतोब पुरवठा थांबवून दोषींवर कारवाई करण्याचै आदेश दिले. या सभेत स्मार्ट मीटर, आरोग्य समस्यांसह व जलजीवन वरून सभागृहात जोरदार चर्चा झाली.
पं. स. सदस्य जितेंद्र गांवकर यांनी केलेला पोषण आहाराचा आरोप माजगाव विद्यालयातील आहे. या प्रकरणी ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून हे धान्य लॅबमध्ये पाठवून अहवाल मागवा असे निर्देश उपसभापती गौरव मुळीक यांनी दिले. तर सभापती सुस्मिता जाधव यांनी तालुक्यातील पुरवठा तात्काळ थांबवा असे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले. मुलांच्या जीवाशी का खेळता ? हे सहन करून घेणार नाही. असे प्रकार होणार असतील तर जिल्हा परिषदेच्या शाळेत मुले कशी पाठवावी ? असा सवाल प्राजक्ता केळुसकर यांनी केला. याप्रश्नी सदस्य शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, अवनी राऊळ, प्रशांत सुकी, ऋतिका देसाई आक्रमक झाले.
दरम्यान, ‘स्मार्ट मीटर’ वाढीव बिलामुळे ग्राहक हैराण होत असल्याने सत्ताधारी, विरोधी सदस्यांनी यावर आक्षेप घेतला मायकल डिसोजा, जितेंद्र गांवकर, उदय पारिपत्ये, शरद धाऊसकर, प्राजक्ता केळुसकर, प्रियांका देसाई आदींना हा मुद्दा मांडला. वाढीव बिलांमुळे सामान्य मेटाकुटीला आले असून शासनाच्या धोरणाला विरोध नाही. तर आक्षेप वाढीव बिलांवर आहे. गोरगरीबांनी दुप्पट बील कशी भरावीत ? असा सवाल केला. तर राज्य सरकारच हे धोरण असून ‘स्मार्ट मीटर’ लावणं बंधनकारक आहे. हिटवेव्हमुळे बीलात वाढ होत असल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता शैलेश राक्षे यांनी दिली. यावेळी ‘स्मार्ट मीटर’ला विरोध नसून वाढीव बिलांवर सदस्यांचा आक्षेप आहे.
यावेळी तिलारीच पाणी मळगावसह इतर ६ गावांना का मिळत नाही ? जीवन प्राधिकरणाने हे काम करणे आवश्यक असताना जलजीवन विभागाकडे कसे गेले? त्यांच्याकडे पैसेच नसून ग्रामस्थांना पाणी कसे मिळेल, हे पाहण आवश्यक आहे. सभापतींनी यावर उत्तर द्याव, अशी मागणी उपसभापती गौरव मुळीक यांनी केली.
या बैठकीत आरोग्य, परिवहन, बांधकाम, कृषी, वनविभाग, बी.एस.एन.एल आदी विभागांच्या अधिकाऱ्यांसह बैठकीत चर्चा करण्यात आली. सदस्यांनी आपल्या सुचना मांडल्या. यावेळी पंचायत समिती सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, गटविकास अधिकारी निलेश जाधव, जितेंद्र गांवकर, मायकल डिसोजा, शरद धाऊसकर, उदय पारिपत्ये, प्रशांत सुकी, महेश धुरी, प्राजक्ता केळुसकर, उत्कर्षा गांवकर, धनश्री मराठे, प्रणाली टिळवे, अवनी राऊळ, प्रथमेश सावंत, सदाशिव राणे, लतिका नाईक, प्रियांका देसाई आदींसह पंचायत समिती सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.


