न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत लाभ पोहोचवा.. नितेश राणे

सिंधुदुर्ग / राजू तावडे 

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या विविध योजनांची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी करून या योजनेचा लाभ राज्यातील अधिकाधिक मच्छिमारांपर्यंत पोहोचविण्यासाठी व्यापक जनजागृती करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. व्यापक हिताच्या या योजनेचा समग्र आढावा घेण्यासाठी मंत्री श्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.

 

या राज्यस्तरीय आढावा बैठकीत पदुम सचिव रामास्वामी एन., मत्स्यआयुक्त प्रेरणा देशभ्रतार, महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले, मत्स्य व्यवसाय विभागाचे राज्यातील सर्व सहाय्यक आयुक्त (एसीएफ) आणि प्रादेशिक उपायुक्त तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री श्री. नितेश राणे म्हणाले, ही योजना व्यापक हिताची असून ती मच्छिमारांना आवडली आहे. त्यामुळे मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त तसेच सहाय्यक आयुक्तांनी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी स्वीकारून प्रत्येक आठवड्यात तालुकानिहाय विशेष शिबिरे आयोजित करावीत. शासनाच्या सर्व योजनांची माहिती तळागाळातील मच्छिमारांपर्यंत पोहोचवून लाभार्थ्यांची संख्या वाढविण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करावेत. विभागनिहाय नियमित बैठका घेऊन प्रत्येक कार्यक्षेत्रातील प्रगतीचा सातत्याने आढावा घ्यावा आणि लाभार्थी वाढीसाठी ठोस कृती आराखडा तयार करावा, असे निर्देश मंत्री श्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत विभागीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रांच्या स्थापनेचाही आढावा यावेळी मंत्री श्री नितेश राणे यांनी घेतला. पुणे आणि नागपूर विभागात प्रशिक्षण केंद्रे सुरू करण्याची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक निधी, मान्यता, जागा निश्चिती आणि प्रस्तावांची सद्यस्थिती यावेळी तपासण्यात आली. मुंबई विभागातील वसई तसेच नागपूर विभागातील गडचिरोली येथे प्रशिक्षण केंद्र उभारणीसाठी सुरू असलेल्या कार्यवाहीला गती देण्याच्या सूचना मंत्री श्री नितेश राणे यांनी यावेळी केल्या.

 

बैठकीत मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत आंतरराज्य अभ्यास दौरे या उपक्रमाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. अन्य राज्यांतील आधुनिक मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा लाभ राज्यातील मत्स्यपालकांना मिळावा, यासाठी अभ्यास दौऱ्यांचे नियोजन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री श्री नितेश राणे यांनी दिले.

निमखारे पाणी कोळंबी संवर्धनासाठी सुपर-इंटेन्सिव्ह पद्धतीने कोळंबी संवर्धन या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीचाही आढावा बैठकीत घेण्यात आला. या योजनेअंतर्गत मानक कार्यपद्धती (एसओपी) आणि नमुना सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यात आले असून प्राप्त प्रस्तावांवर तातडीने योग्य करण्याचे निर्देश मंत्री श्री नितेश राणे यांनी दिले.

—

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे