लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करा, बांदा भाजपा महिला आघाडीची मागणी
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
लैंगिक अत्याचार प्रकरणी बांदा पोलिसांनी अटक केलेल्या अबूसाद इब्राहिम शहा याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. त्याच्यावर जास्तीत जास्त कलमांखाली गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा निष्पक्ष, पारदर्शक आणि जलद तपास करावा आणि आरोपीस कठोर शिक्षा करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडीतर्फे बांदा पोलीस उपनिरीक्षकांकडे करण्यात आली आहे. याबाबत भाजपा बांदा मंडल महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ. रूपाली शिरसाट यांनी पोलिसांना निवेदन दिले.
महिलांच्या सुरक्षिततेशी संबंधित अशा गंभीर प्रकरणांमध्ये कोणतीही दिरंगाई न करता दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी. त्यामुळे समाजात कायद्याचा धाक निर्माण होण्यास मदत होईल आणि महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होईल, असे निवेदनात म्हटले आहे.
एका शाळकरी मुलीला विविध आमिषे दाखवून तिच्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी साफळा रचून अबुसाद इब्राहीम शहा, वय 30, रा. बांदा, मुस्लिमवाडी याला नुकतेच अटक केले. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकाऱ्यांनी बांदा पोलीस निरीक्षकांची भेट घेतली.
यावेळी बांदा सरपंच प्रियांका नाईक, महिला आघाडीच्या स्मिता पेडणेकर, माधवी गाड, अवंती पंडित, भाजप बांदा शहराध्यक्ष निलेश नाटेकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, माजी उपसरपंच जावेद खतीब तसेच भाजप पदाधिकारी संदीप बांदेकर, अमित घोंगडे, साईशकुमार केसरकर, राकेश केसरकर यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी पोलीस प्रशासनाने निवेदनाची दखल घेत प्रकरणाचा सखोल तपास करून कायद्यानुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.


