माझ्या ५० व्या पुस्तकाचा सोहळा कोमसापच्या व्यासपीठावर व्हावा; साहित्यिक ना.बा. रणसिंग
सिंधुदुर्ग / राजू तावडे
साहित्यिक लिहीत असले तरी अनेक विचारवंत असे आहेत जे लिहीत नाहीत पण चांगल्याप्रकारे व्यक्त होतात. त्यांना देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. माझी ४८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लवकरच ५० पुस्तके प्रकाशित होतील. तो सोहळा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या व्यासपीठावर व्हावा अशी माझी इच्छा साहित्यिक ना.बा. रणसिंग यांनी कुडाळ येथे व्यक्त केली.
कोकण मराठी साहित्य परिषद शाखा कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक सदस्यांचा सत्कार कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके आणि तालुकाध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ना. बा. रणसिंग बोलत होते.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कुडाळ शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयात कुडाळ शाखेचे अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ना. बा. रणसिंग, रा. बा. खानोलकर, कृष्णा उर्फ दादा मसके आणि के. एल. फाटक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सुपारीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी साहित्यिक रा.बा. खानोलकर, के. एल. फाटक यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोविंद पवार यांनी केले. सर्व साहित्यिकांचा परिचय मंगेश मसके यांनी करून दिला. प्रास्ताविक प्रा. संतोष वालावलकर यांनी केले. यावेळी डॉ. दीपाली काजरेकर, स्नेहा फणसळकर, वृंदा कांबळी, स्वाती सावंत, सुरेश पवार, डॉ. एस.टी. आवटे, मनोहर सरमळकर, निलेश जोशी, हर्षवर्धन खानोलकर, शंतनू खानोलकर, साईप्रसाद वेंगुर्लेकर आदी उपस्थित होते.


