शक्तीपीठ महामार्गाविरोधात ग्रामस्थांचे देव बांदेश्वराला सामूहिक गाऱ्हाणे
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
“शक्तीपीठ महामार्गाच्या नावाखाली बांदा परिसराचा विकास नव्हे, तर विनाश होणार आहे,” अशी भावना बांदा ग्रामस्थांनी व्यक्त करत रविवारी बांदा गावचे आराध्य दैवत श्री देव बांदेश्वर व ग्रामदैवत श्री भूमिका देवी मंदिरात सामूहिक गाऱ्हाणे घालत महामार्गाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
यावेळी सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच रत्नाकर आगलावे, देवस्थान समिती अध्यक्ष राजाराम उर्फ बाळु सावंत, ग्रामपंचायत सदस्य जावेद खतीब, अरुण मोर्ये, गजानन गायतोंडे, मकरंद मोर्ये, समीर सावंत यांच्यासह बाधित शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी बांदा शहर परिसरातील तब्बल २१४ एकर जमीन संपादित होणार असल्याने शेतकरी, व्यापारी आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे सुपीक शेती, बागायती, घरे, व्यावसायिक आस्थापने तसेच स्थानिकांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामध्ये बांदा गावच्या ब्राम्हण देवळाचा हि समावेश आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत.
बांदा परिसरातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात एकूण ११२ हरकती नोंदविण्यात आल्या आहेत. या हरकतींमध्ये जमिनींचे होणारे नुकसान, विस्थापनाचा प्रश्न, पर्यावरणीय परिणाम तसेच शेती व व्यापारावर होणाऱ्या विपरीत परिणामांचा उल्लेख करण्यात आला आहे. बांदा शहरातील २१४ एकर क्षेत्र, डेगवे १०२ एकर, पडवे माजगाव ४३ एकर, पडवे ३०, असनीये ४५ एकर, दाभील २७ एकर, घारपी ८ एकर, फणसवडे १४० एकर, नेने २५ एकर, उडेली ६० एकर, केगद १६० एकर, झोळंबे ७० एकर, फुकेरी ४५ एकर, कुंभवडे ६५ एकर क्षेत्र संपादित करण्यात येणार आहे.
स्थानिकांच्या भावना आणि उपजीविकेचा विचार करून प्रस्तावित आराखड्यात बदल करावा, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.


