स्मार्ट मीटर आंदोलनावरील सायबर कारवाईचा सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेकडून निषेध
सिंधुदुर्ग / मनोज घाटकर
✍🏼 सावंतवाडी : स्मार्ट वीज मीटरच्या विरोधात जनजागृती करणाऱ्या कार्यकर्त्यांवर सायबर गुन्हे दाखल करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तालुका यांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
संघटनेचे तालुका अध्यक्ष संतोष तावडे आणि तालुका सचिव अस्लम खतीब यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका आहेत. या शंकांचे समाधान करण्याऐवजी आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर आणि पदाधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला जात असल्याचे चित्र अत्यंत चिंताजनक आहे.
त्यांनी सांगितले की, राज्यातील विविध भागांमध्ये वीज ग्राहकांनी स्मार्ट मीटरविरोधात लेखी निवेदने दिली आहेत, तसेच वाढीव वीज बिले, प्रीपेड प्रणाली, ग्राहकांवरील आर्थिक भार आणि मीटर बसविण्याच्या प्रक्रियेबाबत अनेक आक्षेप नोंदवले आहेत. या प्रश्नांवर सविस्तर व पारदर्शक भूमिका मांडण्याऐवजी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल होणे लोकशाहीच्या दृष्टीने योग्य नाही.
तालुका अध्यक्ष संतोष तावडे म्हणाले, “जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. शंका उपस्थित करणाऱ्या नागरिकांना किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हेगार ठरविण्याचा प्रयत्न होऊ नये. मत मांडणे आणि प्रश्न विचारणे हा प्रत्येक नागरिकाचा लोकशाहीतील मूलभूत अधिकार आहे. भविष्यात वीज ग्राहक संघटना कोणत्याही प्रकारच्या दडपशाहीला न जुमानता, न घाबरता अधिक तीव्र पद्धतीने संघर्ष करणार आहे. जर आंदोलन दडपण्यासाठी एक गुन्हा दाखल केला जात असेल, तर वीज ग्राहकांच्या विविध प्रश्नांबाबत महावितरणविरोधात कायदेशीर मार्गाने हजारो तक्रारी व गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही जनआंदोलन उभारू.”
संघटनेने पुढे स्पष्ट केले की, कोकणसाद लाईव्ह या वृत्तवाहिनीचे श्री. सागर चव्हाण यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय किंवा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल.
तालुका सचिव अस्लम खतीब यांनी सांगितले की, स्मार्ट मीटरबाबत नागरिकांच्या सर्व शंकांचे समाधान होईपर्यंत आणि वीज बिलांबाबत पूर्ण पारदर्शकता येईपर्यंत वीज ग्राहक संघटना ग्राहकांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. कोणत्याही प्रकारच्या दबावाला न जुमानता कायदेशीर व लोकशाही मार्गाने आंदोलन अधिक व्यापक करण्यात येईल.
सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, सावंतवाडी तालुक्याने संबंधित कारवाईचा निषेध नोंदवत शासन आणि महावितरणने संवादाचा मार्ग स्वीकारावा, ग्राहकांच्या शंकांचे अधिकृत स्पष्टीकरण द्यावे आणि आंदोलन करणाऱ्यांवर दडपशाहीचे वातावरण निर्माण करू नये, अशी मागणी केली आहे.


