माता न तू वैरीणी…. नवरा मारतो म्हणून १०महीन्याचा मुलीवर राग काढून तिला बादलीत बुडवून मारले
सोलापूर/ वृत्तसंस्था
मुलाला ९ महिने पोटात वाढवणं आणि त्याला जन्म देणं या मातृत्वाच्या सगळ्यात कठीण काळात एक बाई आपला जीव पणाला लावते. मात्र एवढा त्रास आणि कठीण परिस्थितीशी संघर्ष करून एक आई आपल्या पोटच्या मुलाशी क्रूर कशी वागू शकते? असा प्रश्न उपस्थित करणारी संतापजनक घटना सोलापुरात घडली आहे. जन्मदात्या आईने अवघ्या १० महिन्यांच्या बाळाची निर्घृण हत्या केली. धक्कादायक म्हणजे पतीच्या जाचाला कंटाळून तिने हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेनंतर महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.”
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरातील बार्शी येथील रहिवाशी असलेल्या पूजा खुर्दामळेचा पती योगेश खुर्दामळे हा तिचा छळ करायचा. पूजा आणि योगेशला दोन मुली आहेत. एक १० महिन्यांची तर दुसरी ६ वर्षांची. योगेशच्या सततच्या छळाला पूजा कंटाळली होती. दरम्यान तिने संतापाच्या भरात १० महिन्यांच्या मुलीचा गळा दाबून पाण्याच्या बादलीत बुडवून निर्घृण हत्या केली.
पूजा एवढ्यावरच थांबली नाही तिने मोठ्या मुलीला देखील जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मात्र “आई, मी शाळा शिकते, मला मारू नकोस,” अशी आर्त विनवणी केल्यानंतर तिने तिला सोडून दिल्याची माहिती आहे. हत्येनंतर मृत चिमुकलीला खांद्यावर घेऊन आरोपी महिला थेट बार्शी शहर पोलीस ठाण्यात पोहोचली. “माझ्या पतीच्या त्रासाला कंटाळून मुलीची हत्या केली, मला अटक करा,” अशी कबुली तिने पोलिसांना दिली.


