PSV बॅजसाठी SEC ऐवजी अधिवास प्रमाणपत्र – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी
सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर
महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ४(२) अन्वये सार्वजनिक सेवा वाहन (PSV) बॅज/अथॉरायझेशनसाठी आवश्यक असलेल्या स्थानिक वास्तव्याच्या पुराव्याबाबत परिवहन आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण जारी केले आहे.
महसूल व वन विभागामार्फत स्थानिक वास्तव्याचा दाखला (SEC) देण्याच्या कार्यपद्धतीत बदल करण्यात आला असून, अर्जदारांना रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate) तसेच वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality and Domicile Certificate) उपलब्ध करून देण्यात येत आहे.
परिवहन आयुक्त कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, PSV बॅज/अथॉरायझेशनसाठी केवळ रहिवासी प्रमाणपत्र (Residence Certificate) ग्राह्य धरण्यात येणार नाही. अर्जदारांनी महाराष्ट्र शासनाकडून निर्गमित “वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (Age, Nationality and Domicile Certificate)” सादर करणे आवश्यक असून, हे प्रमाणपत्र स्थानिक वास्तव्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.
तसेच, केवळ स्थानिक वास्तव्याचा दाखला (SEC) उपलब्ध नसल्यामुळे PSV बॅज/अथॉरायझेशनसाठीचा अर्ज प्रलंबित ठेवण्यात येणार नाही किंवा नामंजूर करण्यात येणार नाही. अर्जदाराने वय, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र सादर करून महाराष्ट्र मोटार वाहन नियमांतील इतर आवश्यक अटी पूर्ण केल्यास नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल.
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, सिंधुदुर्ग यांनी PSV बॅज/अथॉरायझेशनसाठी अर्ज करणाऱ्या सर्व नागरिकांनी या सुधारित सूचनांची नोंद घेऊन आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत, असे आवाहन केले आहे.


