उद्योजक पैकाणे यांची आडाळी एमआयडीसी येथे शंभर कोटींची गुंतवणूक; आमदार दीपक केसरकर
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून माझे मित्र उद्योजक पैकाणे हे दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी येथे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करून कंटेनर डाटा एन्ट्री हा प्रकल्प सुरू करत आहेत. माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या मित्राने मला दिलेली ही भेट आहे. अशी माहिती माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी आज सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांच्यासोबत क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोलुशन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे मालक सुनील पैकाणे व संचालक संदीप रेडकर उपस्थित होते.
आमदार केसरकर पुढे म्हणाले, पैकाणे यांनी यापूर्वी २०१० सालामध्ये बांदा वाफोली कंपनी सुरू केली. या कंपनीमध्ये आज ७०० स्थानिक युवक नोकरीला आहेत. या भागातील युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून आता क्रिएटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग सोल्युशन इंडिया प्राइव्हेट लिमिटेड ही कंपनी कंटेनर डाटा एन्ट्री या प्रकल्पाद्वारे शंभर कोटीची गुंतवणूक आडाळी येथील एमआयडीसीमध्ये करत आहे. उद्या मी मुंबई येथे उद्योग मंत्र्यांशी मीटिंग आयोजित केली असून या मीटिंगमध्ये पैकाणे यांच्या उद्योगाकरिता एमआयडीसीमध्ये ६ एकर जमीन उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे आगामी काळात येथील शेकडो तरुण तरुणीना रोजगार उपलब्ध होईल. आडाळी एमआयडीसीमध्ये आता दर गुरुवारी एमआयडीसीचे अधिकारी उपलब्ध होणार आहेत. या ठिकाणी जास्त जास्त उद्योगधंदे आणून तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे, असे श्री. केसरकर म्हणाले.
आपला उद्योग केव्हा सुरू होईल या प्रश्नाला उत्तर देताना कंपनीचे मालक सुनील पैकाणे म्हणाले, जागा ताब्यात मिळाल्यानंतर सहा ते आठ महिन्यात आम्ही प्रोडक्शनला सुरुवात करू. कंपनी सुरू झाल्यावर अनेक युवकांना रोजगार उपलब्ध होईल. किमान दहावी पास व आयटीआय कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाईल. ज्या ज्या ठिकाणी आम्ही कंपनी उभारतो त्या त्या ठिकाणच्या स्थानिक युवकांना आम्ही प्राधान्यने रोजगार देतो, असे श्री. पैकाणे म्हणाले. आमचे वाफोली येथे चार कारखाने असून त्या ठिकाणी अजून जागा उपलब्ध झाल्यास येथे आणखी कारखाने उभारण्याची आपली इच्छा त्यांनी बोलून दाखवली.


