भावी पिढीच्या शिक्षणासाठी पतसंस्था मदत करणार :अध्यक्ष गोविंद वाडकर
सिंधुदुर्ग / राजू तावडे
श्री संत रोहिदास सहकारी पतसंस्थेला गेली पाच वर्ष सातत्याने ‘ऑडिट अ’ वर्ग मिळाला असून ठेवीदारांचा पतसंस्थेवर विश्वास कायम आहे. हा विश्वास पुढेही असाच कायम ठेवण्याच्या दृष्टीने पतसंस्थेने भावी पिढीच्या शिक्षणासाठी मदत करण्याचा निर्धार केला आहे. संचालक मंडळाच्या नातेवाईकांना कोणत्याही प्रकारचे कर्ज आम्ही देत नाही, असे प्रतिपादन पतसंस्थेचे अध्यक्ष गोविंद बाळा वाडकर यांनी केले. सावंतवाडी येथील समाज मंदिरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आज शनिवारी पतसंस्थेची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली. यावेळी श्री. वाडकर बोलत होते.
सभेच्या सुरुवातीला सातार्डा येथील माजी सैनिक चंद्रकांत पवार आणि त्यांच्या पत्नी चंद्रावती पवार तसेच पतसंस्थेचे मयत सदस्य यांना श्रद्धांजली वाहीली. यानंतर सभेच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. तेरीजपत्रक, ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रकाचे वाचन करून त्यास मंजुरी देण्यात आली. तसेच अंदाजपत्रकापेक्षा कमी-अधिक झालेल्या खर्चालाही सभागृहाने मंजुरी दिली. सुधारित आदर्श उपविधीसही मंजुरी देण्यात आली.
या आर्थिक वर्षात संस्थेला एकूण ३ लाख ८३ हजार ३६८ रुपये नफा झाल्याचे अध्यक्ष श्री वाडकर यांनी जाहीर केले. लवकरच पतसंस्थेचे सुसज्ज कार्यालय सावंतवाडी शहरामध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
या प्रसंगी २००३ पासून आतापर्यंत पगार किती मिळतो याकडे न पाहता पतसंस्थेला अविरत सेवा देणारे व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांचा विशेष सन्मान करण्यात आला. तसेच सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचाही सन्मान करून गौरव करण्यात आला. संचालक परशुराम चव्हाण यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, पतसंस्थांच्या बदलांबद्दल बोलताना अध्यक्ष वाडकर म्हणाले की, “सहकारी बँकांना लावण्यात आलेले आरबीआयचे नियम आणि नियमावली आता पतसंस्थांनाही लागू करण्यात आली असून पतसंस्था सुद्धा बँकांच्या बरोबरीने आल्या आहेत. त्यामुळे एकसूत्रीपणासाठी आता पतसंस्थांच्या खात्यातील रकमा शासनाकडून वापरल्या जाऊ शकतात.
या सर्वसाधारण सभेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, संचालक परशुराम चव्हाण, मंगेश कदम, संगीता वाडकर, सुलोचना वाडकर यांच्यासह मनोहर वेंगुर्लेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता विजय चव्हाण, नरेश कारीवडेकर, क्लार्क दशरथ वाडकर, पिग्मी प्रतिनिधी नारायण केसरकर आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.कार्यक्रम प्रसंगी प्रास्ताविक व्यवस्थापक सदानंद चव्हाण यांनी केले, तर उपस्थितांचे आभार अध्यक्ष गोविंद वाडकर यांनी मानले.


