न्यूज १० नेटवर्क मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

फोलो करा

November 7, 2026

बातमी जशी आहे तशी

सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर

 

सिंधुदुर्ग/ राजू तावडे

     “संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे. मात्र, हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला ‘साधनेचे’ आणि ‘गुरुचरणांचे’ भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात परिवर्तीत होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते,” असे प्रतिपादन सनातन संस्थेचे श्री. आनंद मोंडकर यांनी केले.

सनातन संस्थेच्या वतीने २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवात’ ते बोलत होते. यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर जिल्ह्यात ६ ठिकाणी हा महोत्सव संपन्न झाला.

यावेळी माजी सैनिक सुभेदार श्री. प्रमोद नाईक म्हणाले,”मानवी जीवनाचे अंतिम ध्येय हे गाडी, बंगला, पैसा किंवा भौतिक सुखसुविधा नसून ईश्वरप्राप्ती आणि ईश्वरानंदाची अनुभूती हेच आहे. ही प्राप्ती केवळ गुरुकृपेनेच शक्य होते. गुरूंची कृपा प्राप्त व्हावी, यासाठी त्यांच्या आज्ञेचे श्रद्धेने, तत्परतेने आणि निष्ठेने पालन करून नियमित साधना करणे आवश्यक आहे,”

भारतीय संस्कृती, परंपरा आणि सण-उत्सव यांचे जतन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सांगून नियमित साधना, धर्मशिक्षण आणि समाजजागृती यांद्वारे राष्ट्र व धर्म यांच्या संरक्षणासाठी योगदान देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचन, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप भावपूर्णरित्या करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

News10

Avatar

संपादक

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Website Designed | Newsphere by AF themes.
Translate »
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे