ज्युडो स्पर्धेत सैनिक स्कूलच्या हन्शाल साटेलकर याला सुवर्ण पदक
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने ओरोस येथील क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली. कॅडेट हन्शाल सचिन साटेलकर याने या स्पर्धे सुवर्ण पदक पटकावले.
या स्पर्धेत उत्कृष्ट कौशल्याचे प्रदर्शन करत १४ वर्षे वयोगटात ३५ ते ४० किलो वजनी गटात कॅडेट हन्शाल सचिन साटेलकर याने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक पटकावले. तर २० ते ३० किलो वजनी गटात कॅडेट हित राकेश धसकर, ३५ ते ४० किलो वजनी गटात कॅडेट शेवोन शानल परेरा यांनी द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक पटकावले. १७ वर्षे वयोगटात ५१ ते ५५ किलो वजनी गटात कॅडेट धनुष गोविंद परब याने तृतीय क्रमांक मिळवून कांस्यपदक पटकावले. १९ वर्षे वयोगटात ६६ ते ७३ किलो वजनी गटात कॅडेट चिराग अनिल साळूंखे याने द्वितीय क्रमांक मिळवून रजत पदक पटकावले.
प्रथम क्रमांक मिळणाऱ्या कॅडेट हन्शाल सचिन साटेलकर याची विभागस्तरीय जुडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कूल आंबोली प्रशालेचे क्रीडा शिक्षक दिनेश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
जुडो स्पर्धेतील विजेते व क्रीडाप्रशिक्षक दिनेश जाधव व मनोज देसाई यांचे संस्थाध्यक्ष सुनील राऊळ, संचालक सेक्रेटरी जॉय डॉन्टस, ऑफिस सेक्रेटरी दीपक राऊळ, प्राचार्य नितीन गावडे यांनी अभिनंदन केले .


