कोणत्याही महसुली प्रश्नांवर यशस्वी तोडगा काढण्यासाठी महसूल च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कटाक्ष असला पाहिजे.. नितेश राणे
सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर
कोणत्याही महसुली प्रश्नांवर यशस्वी तोडगा काढण्यासाठी महसूल च्या कर्मचारी व अधिकाऱ्यांचा कटाक्ष असला पाहिजे तसेच पुढील महसूल दिनावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 90% अधिकारी हे राज्यस्तरावर सन्मानित केले जातील अशा पद्धतीने कामाला लागा अशा सूचना आज राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी महसूल दिनानिमित्त केल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील मायनाक भंडारी सभागृहामध्ये आज महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा परिषदेचे बांधकाम व वित्त सभापती संतोष साठविलकर, भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत, सामान्य प्रशासनच्या उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे व्यासपीठावर उपस्थित होत्या.
यावेळी जिल्ह्यातील दिव्यांग पालकत्व प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जिल्हास्तरावरील उत्कृष्ट कर्मचारी व अधिकारी पुरस्कारांचे वितरणही पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.
पालकमंत्री नितेश राणे म्हणाले की जनतेच्या अनेक थेट प्रश्नांची संबंधित महसूल विभाग हा अत्यंत महत्त्वाचा विभाग असतो. दाखल्यापासून ते जमिनीच्या व्यवहारापर्यंत अनेक बाबींसाठी महसूल विभागाकडे जनतेला यावे लागत येत असते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जमीन व्यवहार व खाण व्यवसाय या अत्यंत महत्त्वाच्या दोन गोष्टीकडे महसूल विभाग चाणाक्षपणे काम करून अनेक वेळा अनेक गोष्टींवरती तोडगा काढत असतो. त्यामुळे एखाद्या प्रश्नांवरती तोडगा काढण्यावरती भर देऊन तो प्रश्न कसा सुटेल यावर भर द्यावा असेही त्यांनी यावेळी सूचित केले.
जी लोक व्यासपीठावर कधी येत नाहीत अशा कर्मचाऱ्यांचाही आज सत्कार झाला ही कौतुकास्पद बाब आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याने जी 81 कोटींची वसुली केलेली आहे त्यामध्ये या सर्व कर्मचाऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्यामुळे हे उद्दिष्ट महसूल विभाग गाठू शकलेला आहे हे नाकारता येणार नाही असेही ते म्हणाले.राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे त्यांनी यावेळी विशेष अभिनंदन केले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनीही महसूल दिनाच्या निमित्ताने उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले तर आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी केले. या कार्यक्रमाला जिल्हाभरातून महसूल चे कर्मचारी व अधिकारी उपस्थित राहिलेले होते.


