महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उद्या ता. 3 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत आहेत.
सिंधुदुर्गनगरी / देवयानी वरसकर
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा संयुक्त जिल्हा दौरा
सोमवार, दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कणकवली तहसीलदार कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे . जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपापल्या अडचणी संदर्भातील निवेदने लिखित स्वरूपात महसूल मंत्री व पालकमंत्री यांना देण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले आहे.
महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या वर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या दौऱ्यात नागरिकांची निवेदने घेतली होती आणि शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता शेतपानंद रस्ते हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम महाराष्ट्रभर त्यांनी उत्तमरीत्या सुरू केला याची घोषणा त्यांनी गतवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातूनच केली.त्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला अधिक महत्त्व येत आहे. तसेच बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण योजना बावनकुळे यांनी आणल्या. विशेषतः महिलांसाठी शेतकरी दाखला मिळण्याची महत्त्वपूर्ण योजना नुकतीच त्यांनी जाहीर केली. यामुळे सर्व महिलांना शेतकरी दाखले मिळण्यास सुरुवात झाली असून हा निर्णय महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना शासनाने राबवल्याने त्याचा सातबारा कोरा व्हावा यासाठी चंद्रशेखर बावनकुळे हे प्रयत्नशील आहेत याबाबत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी महिला तसेच महसूल संदर्भातील कोणत्याही अडचणी असल्यास नागरिकांनी तहसीलदार कार्यालय कणकवली येथे साडेदहा वाजता हजर राहत लिखित स्वरूपातील आपली निवेदने त्यांच्याकडे द्यावीत असे आवाहन भाजपातर्फे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी जनतेला केले आहे.


