माजी नगरसेवक विलास जाधव यांच्या कार्यतत्परतेमुळे रस्ता तात्काळ वाहतुकीसाठी खुला.
सावंतवाडी, वार्ताहर – दि. ३ ऑगस्ट : आज सकाळी सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास शिल्पग्राम हॉटेलच्या कंपाऊंडलगत महादेव भाटल्याच्या दिशेने असलेले गुलमोहराचे भलेमोठे झाड मुळासकट उन्मळून रस्त्यावर कोसळले. झाड कोसळल्यामुळे विद्युत तारा तुटून खाली पडल्या. सुदैवाने त्यावेळी विद्युतपुरवठा बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली.
या घटनेमुळे महादेव भाटल्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. ही माहिती मिळताच सावंतवाडी नगर परिषदेचे माजी नगरसेवक श्री. विलास जाधव यांनी तात्काळ कार्यतत्परता दाखवत नगर परिषद कर्मचाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. तसेच आरोग्य विभागाचे श्री.म्हापसेकर यांनाही घटनेची माहिती देऊन आवश्यक यंत्रणा घटनास्थळी पाठविण्याची व्यवस्था केली.
यानंतर श्री. जाधव स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावर पडलेले झाड हटविण्याचे काम तातडीने पूर्ण करून वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली. झाड कंपाउंडच्या भिंतीवर पडल्यामुळे शिल्पग्राम च्या कंपाउंड ची देखील हानी होऊन नुकसान झाले आहे.
श्री. विलास जाधव यांनी दाखविलेली तत्परता, समन्वय आणि जनहिताची भावना याबद्दल परिसरातील नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत असून, जनतेच्या प्रश्नांप्रती त्यांची असलेली तळमळ आणि तत्पर कार्यपद्धती पुन्हा एकदा अधोरेखित झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.


