मुंबई गोवा महामार्गावर साळिस्ते मध्ये अपघातात एकाचा मृत्यू
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
कणकवली तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील साळीस्ते येथे बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या HR 61 D 1261 क्रमांकाच्या कंटेनरला मागून TVS रायडर दुचाकीची जोरदार धडक बसली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वाराच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.
अपघाताची माहिती मिळताच तळेरे बाजारपेठ मित्रमंडळाच्या रुग्णवाहिकेने जखमीला तातडीने कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नसून, अपघातग्रस्त दुचाकी TVS रायडर कंपनीची असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.


