कोकंणातील सुप्रसिद्ध स्टोन आर्टिस्ट ऋत्विका पालकर-नाईक यांची ११ ऑगस्टला आकाशवाणी वर मुलाखत
सिंधुदुर्ग / राजू तावडे
दगड, गोटे आणि निसर्गातील विविध घटकांना कलात्मक रूप देत अनोख्या कलाकृती साकारणाऱ्या ऋतिका पालकर-नाईक यांच्या कलेचा परिचय करून देणारा विशेष कार्यक्रम आकाशवाणी सिंधुदुर्गनगरीवरून प्रसारित होणार आहे. ‘स्टोन अँड पेबल आर्ट’ या विषयावर आधारित या कार्यक्रमात शिल्पा निगुडकर यांनी ऋतिका पालकर – नाईक यांच्याशी संवाद साधला आहे.
निसर्गात सहज उपलब्ध होणारे दगड आणि गोटे यांच्यामध्ये दडलेले सौंदर्य शोधून त्यांना कल्पकतेने कलाकृतीचे स्वरूप देण्याचे काम ऋतिका पालकर-नाईक करतात. त्यांच्या या अनोख्या कलेमागील प्रेरणा, कलाकृती साकारण्याची प्रक्रिया आणि या क्षेत्रातील अनुभव याविषयी त्यांनी संवादातून माहिती दिली आहे.
या विशेष कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉ. सुनील गायकवाड असून, रसिक श्रोत्यांना दगड आणि गोट्यांच्या माध्यमातून साकारल्या जाणाऱ्या कलाविश्वाची वेगळी ओळख या कार्यक्रमातून करून घेता येणार आहे. ऋतिकाने दिल्ली,पुणे येथे प्रदर्शन भरविण्यात आले होते.. त्याला अमाप प्रतिसाद मिळाला होता… तिचा विठ्ठल लाखमोलाचा ठरला होता.
मंगळवार, ११ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी सिंधुदुर्गनगरीच्या एफएम १०३.६ मेगाहर्ट्झवर ऐकता येणार आहे. तसेच प्रसार भारतीच्या WAVES OTT प्लॅटफॉर्म आणि NewsOnAir अॅपवरही हा कार्यक्रम उपलब्ध राहणार आहे.
दगड आणि गोट्यांना कलात्मक रूप देणाऱ्या या आगळ्यावेगळ्या कलेची माहिती जाणून घेण्यासाठी कला रसिकांसह सर्वांनी या विशेष कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.



