सावंतवाडीच्या तनिष चव्हाणला झारखंड कुकरी लीगमध्ये राष्ट्रीय स्तरावर यश
सिंधुदुर्ग/ राजू तावडे
सावंतवाडीच्या तनिष चव्हाणने आपल्या पाककलेची चुणूक दाखवत आदिवासी खाद्यसंस्कृतीचा सुगंध, पारंपरिक चवींचा आस्वाद आणि आधुनिक पाककलेचा सुरेख संगम घडविणाऱ्या झारखंड कुकरी लीगच्या आठव्या पर्वात राष्ट्रीय स्तरावर यश संपादन केले आहे. आयएचएम मुंबईचा विद्यार्थी असलेल्या तनिष महेश चव्हाण याने या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
आदिवासी दिनाच्या पूर्वसंध्येला झारखंड येथील इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (आयएचएम) येथे झारखंड कुकरी लीगच्या आठव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात आले होते. देशाच्या विविध भागांतून ३२ स्पर्धकांनी यामध्ये सहभाग दर्शविला होता.
या स्पर्धेत विविध संस्थांमधून १७ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. अंतिम फेरीत प्रत्येक स्पर्धकाने आपल्या पाककलेतील कसब पणाला लावत परीक्षकांसमोर पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे आकर्षक सादरीकरण केले. यामध्ये आयएचएम हैदराबादच्या शिरीष सुगतीक यांनी प्रथम क्रमांक पटकावत १० हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.
तर सावंतवाडीचा आणि आयएचएम मुंबईचा विद्यार्थी तनिष महेश चव्हाण याने आपल्या उत्कृष्ट पाककृती व प्रभावी सादरीकरणाच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावत ७ हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले. सीआयएच हैदराबादच्या एम. सूर्य यांनी तृतीय क्रमांक मिळवत ४ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.
तनिष चव्हाण हा आजगाव अध्यापक विद्यालयाच्या प्राध्यापिका सौ. प्रतिभा चव्हाण व महेश चव्हाण यांचा सुपुत्र आहे. तनिषने मिळविलेल्या या उल्लेखनीय यशामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. लहान वयातच पाककलेतील कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर सिद्ध करत तनिषने सावंतवाडीच्या नावाची चव थेट झारखंडच्या व्यासपीठावर पोहोचवली.


